For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

चेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर

09:57 PM May 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
चेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर
Ahmedabad, May 30 (ANI): Chennai Super Kings players celebrate with the trophy after winning the final match of Indian Premier League 2023 by beating Gujarat Titans with 5 wickets, at Narendra Modi Stadium, in Ahmedabad on Tuesday. (ANI Photo)
रवींद्र जडेजाची निर्णायक खेळी : साई सुदर्शन, साहा, मोहित शर्मा यांची कामगिरी वाया

वृत्तसंस्था / अहमदाबाद

Advertisement

अखेरच्या चेंडूतपर्यंत रंगलेल्या या अंतिम सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या शेवटच्या दोन चेंडूवरील षटकार आणि चौकाराच्या आतषबाजीने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सचा डकवर्थ लेव्हिस नियमाच्या आधारे 5 गड्यांनी पराभव करत आयपीएल चषकावर आपले पाचव्यांदा मोहोर उमटवली. पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी चेन्नई सुपर किंग्जला 15 षटकात 171 धावांचे नवे उद्दिष्ट दिले होते. दरम्यान चेन्नईने 15 षटकात 5 बाद 171 धावा जमवित गुजरातला सलग दुसऱ्या अजिंक्यपदापासून रोखले.

Advertisement

2023 च्या टाटा आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात साई सुदर्शन आणि वृद्धिमन साहा यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर यजमान आणि विद्यमान विजेत्या गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी 215 धावांचे कडवे आव्हान दिले. सुदर्शनचे शतक 4 धावांनी हुकले.

Advertisement

गुजरातचा डाव संपल्यानंतर पावसाला पुन्हा प्रारंभ झाल्याने सुमारे दीड तास खेळ थांबवावा लागला. पंचांनी रात्री 11.30 वाजता मैदान आणि खेळपट्टीची पाहणी करुन खेळ सुरु करण्याचा आदेश दिला पण त्यांनी चेन्नईला डकवर्थ लेव्हिस नियमाच्या आधारे 15 षटकात विजयासाठी 171 धावांचे नवे उद्दिष्ट दिले.

गायकवाड आणि कॉनवे यांनी सलामीच्या गड्यासाठी 39 चेंडूत 74 धावांची भागिदारी केली. नूर अहमदने गायकवाडला रशिद खानकरवी झेलबाद केले. त्याने 16 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 26 धावा जमविल्या. त्यानंतर नूर अहमदने आपल्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर कॉनवेचा बळी मिळविला. कॉनवेने 25 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 47 धावा जमविल्या. पॉवरप्ले दरम्यान चेन्नईने 4 षटकात 52 धावा जमविल्या होत्या. अजिंक्य रहाणे आणि शिवम दुबे यांनी तिसऱ्या गड्यासाठी 39 धावांची भागिदारी केली. दरम्यान मोहित शर्माने अजिंक्य रहाणेला झेलबाद केले. त्याने 13 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 27 धावा जमविल्या. मोहित शर्माने आपल्या दुसऱ्या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर चेन्नईच्या अंबाती रायडू आणि कर्णधार धोनी यांना बाद केल्याने चेन्नईवर पुन्हा दडपण आले. रायडूने 8 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 19 धावा जमविल्या. धोनी पहिल्या चेंडूवर खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाला.

चेन्नईला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज होती. हे षटक टाकण्याची जबाबदारी मोहित शर्मावर सोपविण्यात आली होती. त्याने या षटकातील पहिल्या चार चेंडूवर केवळ 3 धावा दिल्या होत्या. त्यामुळे गुजरातचे पारडे थोडे जड वाटत होते. पण अष्टपैलू जडेजाने या षटकातील पाचव्या चेंडूवर उत्तुंग षटकार तर शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार ठोकून गुजरातचे आव्हान संपुष्टात आणले. दुबेने 21 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 32 तर जडेजाने 6 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 15 धावा जमविल्या. गुजरात टायटन्सतर्फे मोहित शर्माने 36 धावात 3 तर नूर अहमदने 17 धावात 2 गडी बाद केले. चेन्नईच्या डावात 10 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले.

या स्पर्धेतील हा अंतिम सामना रविवारी पावसामुळे एक दिवस उशिरा पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे शौकिनांची निराशी झाली होती. पण सोमवारी पावसाने पूर्ण दडी मारल्याने शौकिनांना पुन्हा गुजरातच्या फलंदाजांनी फटकेबाजीने बेहद खुश केले. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजी दिली.

साहा आणि गिल या सलामीच्या जोडीने 42 चेंडूत 67 धावांची भागिदारी केली. या जोडीने अर्धशतकी भागिदारी 42 चेंडूत नोंदविली. तर गुजरातने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 62 धावा जमविल्या. डावातील 7 व्या षटकात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर गिल पुढे येऊन फटका मारण्याच्या नादात यष्टीरक्षक धोनी करवी यष्टीचीत झाला. त्याने 20 चेंडूत 7 चौकारांसह 39 धावा जमविल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या साई सुदर्शनने सुरुवातीपासूनच षटकार आणि चौकारांवर अधिक भर दिला. त्याला साहाची चांगली साथ मिळाली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 7 षटकात 64 धावांची भागिदारी केली. गुजरातचे शतक 67 चेंडूत फलकावर लागले. तर साहाने 36 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. 14 व्या षटकात दीपक चहरने सलामीच्या साहाला धोनीकरवी झेलबाद केले. त्याने 39 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 54 धावा झोडपल्या.

कर्णधार हार्दिक पांड्या आणि साई सुदर्शन या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 5.3 षटकात 81 धावांची भर घातली. साई सुदर्शनने आपले अर्धशतक 33 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. गुजरातचे दीडशतक 94 चेंडूत फलकावर लागले. सुदर्शन आणि पांड्या यांनी तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी केवळ 23 चेंडूत नोंदविली. गुजरातच्या 200 धावा 114 चेंडूत फलकावर लागल्या. डावातील शेवटच्या षटकामध्ये चेन्नईच्या पथिरनाने तिसऱ्या आणि शेवटच्या चेंडूवर साई सुदर्शन आणि रशिद खान यांना बाद केले. साई सुदर्शन उत्तुंग फटका मारण्याच्या नादात पायचीत झाला. त्याने 47 चेंडूत 6 षटकार आणि 8 चौकारांसह 96 धावा झळकविल्या. कर्णधार पांड्या 12 चेंडूत 2 षटकारांसह 21 धावांवर नाबाद राहिला. रशिद खानला मात्र आपले खाते उघडता आले नाही. गुजरातच्या डावात 9 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. गुजरात टायटन्सने पहिल्या 1 ते 6 षटकांमध्ये 62 धावा, 7 ते 15 षटकांमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 81 धावा तर 16 ते 20 या षटकामध्ये त्यांनी 2 गड्यांच्या मोबदल्यात 71 धावा जमविल्या. गुजरातला अवांतराच्या रुपात 4 धावा मिळाल्या. चेन्नईतर्फे पथिरनाने 44 धावात 2 तर दीपक चहर आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - गुजरात टायटन्स : 20 षटकात 4 बाद 214 (साहा 39 चेंडूत 1 षटकार 5 चौकारांसह 54, गिल 20 चेंडूत 7 चौकारांसह 39, साई सुदर्शन 47 चेंडूत 6 षटकार 8 चौकारांसह 96, हार्दिक पांड्या 12 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 21, रशिद खान 0, अवांतर 4, पथिरना 2-44, दीपक चहर 1-38, रवींद्र जडेजा 1-38).

चेन्नई सुपर किंग्ज : (विजयासाठी 15 षटकात 171 धावांचे उद्दिष्ट), 15 षटकात 5 बाद 171 (गायकवाड 16 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 26, कॉनवे 25 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 47, शिवम दुबे 21 चेंडूत 2 षटकारांसह नाबाद 32, रहाणे 13 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 27, रायडू 8 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 19, धोनी 0, जडेजा 6 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 15, अवांतर 5, मोहित शर्मा 3-30, नूर अहमद 2-17).

Advertisement
Tags :
×

.