महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चेन्नई सुपर किंग्जचा सलग दुसरा विजय

06:58 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

  वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या सातव्या सामन्यात विद्यमान विजेता आणि यजमान चेन्नई सुपर किंग्जने आपला सलग दुसरा विजय नोंदविला. चेन्नईने गुजरात टायटन्सचा 63 धावांनी पराभव केला.

Advertisement

गुजरात टायटन्सला विजयासाठी 207 धावांचे आव्हान दिले. चेन्नई संघातर्फे रचिन रवेंद्र, शिवम दुबे आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी दमदार फलंदाजी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजरात टायटन्सने 20 षटकात 8 बाद 143 धावा जमविल्या. तुषार देशपांडे, दीपक चहर, एम. रेहमान यांनी प्रत्येकी 2 तर मिचेल आणि पथीराना यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

चेन्नई सुपर किंग्जच्या शिस्तबध्द गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणासमोर गुजरात टायटन्सचे फलंदाज झटपट बाद झाले. चेन्नईचे 207 धावांचे आव्हान गुजरातला पेलवले नाही. गुजरातच्या डावामध्ये साई सुदर्शनने 31 चेंडूत 3 चौकारांसह 37, साहने 17 चेंडूत 4 चौकारांसह 21, मिलरने 16 चेंडूत 3 चौकारांसह 21, ओमरझाईने 1 चौकारासह 11, विजय शंकरने 1 षटकारासह 12, उमेश यादवने 1 षटकारासह नाबाद 10 धावा जमविल्या. गुजरातला अवांतराच्या रूपात 11 धावा मिळाल्या. गुजरातने पॉवरप्लेच्या 6 षटकात 43 धावा जमविताना 2 गडी गमविले. गुजरातचे अर्धशतक 40 चेंडूत, शतक 76 चेंडूत फलकावर लागले. गुजरातच्या डावामध्ये 3 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. चेन्नईतर्फे शिवम दुबेच्या जागी पथिरानाला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरविले. तर गुजरातर्फे मोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात आणले. या स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्जचा हा सलग दुसरा विजय असून ते गुणतक्यात 4 गुणासह पहिल्या स्थानावर आहेत.

तत्पूर्वी, या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार गायकवाड आणि रचिन रवींद्र या सलामीच्या जोडीने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजीवर भर दिला. या जोडीने 32 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. रशिद खानने रचिन रवींद्रला यष्टीरक्षक साहाकरवी यष्टीचित केले. त्याने 20 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारासह 46 धावा जमविल्या. रचिन बाद झाल्यानंतर गायकवाडला रहाणेकडून बऱ्यापैकी साथ मिळाली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 42 धावांची भागीदारी केली. साई किशोरने रहाणेला यष्टीरक्षककरवी यष्टीचित केले. त्याने 12 धावा जमविल्या. जॉन्सनने गायकवाडला झेलबाद केले. त्याने 36 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 46 धावा जमविल्या. चेन्नईची स्थिती यावेळी 12.3 षटकात 3 बाद 127 अशी होती.

शिवम दुबे आणि मिचेल व रवींद्र यांच्या फटकेबाजीमुळे चेन्नईला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. शिवम दुबेने 23 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारासह 51 धावा झोडपल्या. दुबे आणि मिचेल यांनी चौथ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 29 चेंडूत नोंदविली. दुबेने आपले अर्धशतक 22 चेंडूत 5 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. रशिद खानने दुबेला शंकरकरवी झेलबाद केले. समीर रिजवीने 6 चेंडूत 2 षटकारांसह 14 धावा जमविल्या. रवींद्र जडेजा 1 चौकारासह 7 धावावर धावचित झाला. मिचेलने 20 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 24 धावा जमविल्या. चेन्नईच्या डावात 11 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. चेन्नईने पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकात 69 धावा जमविताना 1 गडी गमविला. चेन्नईचे अर्धशतक 27 चेंडूत, शतक 59 चेंडूत, दीड शतक 89 चेंडूत तर द्विशतक 118 चेंडूत फलकावर लागले. गुजरातर्फे रशिद खानने 2, तर साई किशोर, जॉन्सन आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. या स्पर्धेसाठी 7.60 कोटी रूपयांच्या बोलीवर चेन्नईने खरेदी केलेल्या समीर रिजवीने केवळ 6 चेंडूत 2 उत्तुंग षटकार ठोकले. रशिद खानच्या गोलंदाजीवर रिजवीने ही फटकेबाजी केल्याने रशिद खानने 4 षटकात 49 धावा देत 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपर किंग्ज 20 षटकात 6 बाद 206 (गायकवाड 46, रचिन रवींद्र 46, रहाणे 12, शिवम दुबे 51, मिचेल नाबाद 24, रिजवी 14, जडेजा 7, अवांतर 6, रशिद खान 2-49, साई किशोर 1-28, जॉन्सन 1-35, मोहित शर्मा 1-36). गुजरात टायटन्स 20 षटकात 8 बाद 143 (साहा 21, गील 8, साईसुदर्शन 37, विजय शंकर 12, मिलर 21, ओमरझायी 11, तेवातिया 6, रशिद खान 1, उमेश यादव नाबाद 10, जॉन्सन नाबाद 5, अवांतर 11, चहर 2-28, एम. रेहमान 2-30, देशपांडे 2-21, मिचेल 1-18, पथीराना 1-29).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article