चेन्नईने बिघडवला केपेआरचा खेळ
सीएसकेचा 2 विकेट्सनी विजय : पराभवानंतरही केपेआरच्या प्लेऑफच्या आशा कायम
वृत्तसंस्था/ कोलकाता
अखेरच्या षटकात धोनीचा षटकार अन् अंशुल कंबोजच्या चौकारासह चेन्नईने यंदाच्या मोसमातील तिसरा विजय मिळवला. आयपीएल 2025 मधून बाहेर झालेल्या चेन्नई सुपर किंग्सने केकेआरचा 2 विकेट्सने पराभव केला. चेन्नईच्या या विजयाचे हिरो नूर अहमद आणि डेवाल्ड ब्रेविस ठरले. प्रथम फलंदाजी करताना केपेआरने 6 बाद 179 धावा केल्या. यानंतर चेन्नईने विजयी लक्ष्य 19.4 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
प्रारंभी, केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. संघाला पहिला धक्का 11 धावांवर पडला. रहमानउल्लाह गुबराज 11 धावा करून आऊट झाला. पण, त्यानंतर अजिंक्य रहाणेने सुनील नरेनला चांगली साथ दिली आणि दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 58 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. ही जोडी नूर अहमदने फोडली. दोन धावांच्या आत, रहाणेही 48 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. या खेळीमुळे रहाणेने आयपीएलमध्ये एक मोठी कामगिरी केली. या मेगा लीगमध्ये 5000 धावा करणारा तो जगातील नववा खेळाडू ठरला. नरेन 26 धावा काढून माघारी परतला.
हे दोघे बाद झाल्यानंतर केकेआर संघ अडचणीत सापडल्याचे दिसत होते, परंतु मनीष पांडे आणि आंद्रे रसेल यांनी काही शानदार फटके खेळले. दरम्यान, रसेलने 21 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 38 धावांची खेळी खेळली. पांडे 28 धावा करून नाबाद राहिला. चेन्नई सुपर किंग्जकडून फिरकी गोलंदाज नूर अहमदने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज आणि फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
सीएसकेचा शानदार विजय
केकेआरच्या 180 धावांचा पाठलाग करताना चेन्नईचे दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद झाले. पण त्यानंतर उर्विल पटेलने 11 चेंडूंत 31 धावांची तुफानी खेळी साकारत संघाला सावरले. त्यानंतर डेव्हाल्ड ब्रेव्हिसने 52 धावांची खेळी साकारली, पण त्याला अखेरपर्यंच किल्ला लढवता आला नाही. ब्रेव्हिस बाद झाला आणि महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला आला. धोनीने अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि संघाला सामना जिंकवून दिल्याचे पाहायला मिळाले. जडेजाने 19 तर धोनीने 17 धावांची खेळी साकारली. यामुळे मुंबईने विजयी लक्ष्य 19.4 षटकांत पूर्ण करत शानदर विजयाला गवसणी घातली.
संक्षिप्त धावफलक
केकेआर 20 षटकांत 6 बाद 179 (गुरबाज 11, सुनील नरेन 26, अजिंक्य रहाणे 48, मनीष पांडे नाबाद 36, आंद्रे रसेल 38, नूर अहमद 31 धावांत 4 बळी, जडेजा व अंशुल कंबोज प्रत्येकी एक बळी)
चेन्नई सुपर किंग्स 19.4 षटकांत 8 बाद 183 (उर्विल पटेल 31, रविंद्र जडेजा 19, ब्रेविस 25 चेंडूत 52, शिवम दुबे 45, धोनी नाबाद 17, हर्षित राणा व वरुण चक्रवर्ती प्रत्येकी दोन बळी)