For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नईने उघडले विजयाचे खाते

06:58 AM Apr 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
चेन्नईने उघडले विजयाचे खाते
Advertisement

संजू सॅमसनचे दमदार नाबाद शतक : ओव्हरटनचे 4 बळी

Advertisement

वृत्तसंस्था, चेन्नई

सामनावीर संजू सॅमसनचे दमदार नाबाद शतक तसेच आयुष म्हात्रेचे अर्धशतक आणि ओव्हरटनच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने 2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आपल्या सलग पराभवाच्या हॅट्ट्रीकनंतर विजयाचे खाते उघडले. शनिवारच्या सामन्यात चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सवर 23 धावांनी विजय मिळवून गुणतक्त्यात 2 गुण मिळविले.

Advertisement

शनिवारचा स्पर्धेतील हा 18 वा सामना होता. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाजी दिली. पहिल्या तीन सामन्यात फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत असलेल्या संजू सॅमसनने दमदार फलंदाजी करत नाबाद शतक झळकाविले. आयुष म्हात्रेने 59 धावा जमविल्यानंतर दुखापतीमुळे तो निवृत्त झाला. चेन्नईने 20 षटकात 2 बाद 212 धावा जमविल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा डाव 20 षटकात 189 धावांत आटोपला.

चेन्नईच्या डावात कर्णधार ऋतुराज गायकवाडने संजू सॅमसन समवेत पहिल्या गड्यासाठी 38 चेंडूत 62 धावांची भागिदारी केली. गायकवाड बाद झाल्यानंतर म्हात्रे आणि सॅमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 113 धावांची शतकी भागिदारी केली. म्हात्रेने 36 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 59 धावा जमविल्या. यानंतर तो दुखापतीमुळे निवृत्त झाला. संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 37 धावांची भागिदारी केली. दुबेने 10 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 20 धावा झळकाविल्या. 2026 च्या आयपीएल स्पर्धेतील सॅमसनचे हे पहिले शतक आहे. त्याने 56 चेंडूत 4 षटकार आणि 15 चौकारांसह नाबाद 115 धावा झळकाविल्या. सॅमसनने 26 चेंडूत 9  चौकारांसह अर्धशतक तर 52 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांसह शतक पूर्ण केले. दिल्लीतर्फे अक्षर पटेलने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज चांगल्या सलामीनंतर चेन्नईच्या अचूक गोलंदाजीसमोर ठराविक अंतराने बाद झाले. निशांका आणि राहूल यांनी सलामीच्या गड्यासाठी 30 चेंडूत 61 धावांची भागिदारी केली होती. निशांकाने 24 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 41 तर राहुलने 18 धावा केल्या. स्टब्जने एकाकी लढत देत 38 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 60, आशुतोष शर्माने 2 षटकार आणि 1 चौकारासह 19, तर मिलरने 1 षटकार आणि 1 चौकारासह 17 धावा केल्या. चेन्नईतर्फे ओव्हरटनने 18 धावांत 4 तर कंबोजने 35 धावांत 3 गडी बाद केले. खलिल अहमद, नूर अहमद, गुरुजपनित सिंग यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.

Advertisement
Tags :

.