For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चेन्नई विजयी ट्रॅकवर

06:58 AM Apr 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
चेन्नई विजयी ट्रॅकवर
Advertisement

लखनौवर 5 गडी राखून विजय : शिवम दुबे-धोनीची मॅचविनिंग खेळी : जडेजा-पथिराणाचे दोन बळी

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

महेंद्रसिंग धोनी आणि शिवम दुबे यांच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर चेन्नईने लखनौवर दमदार विजय साकारला. या सामन्यात चेन्नईला विजय आणि महेंद्रसिंग धोनी दोघेही गवसल्याचे पाहायला मिळाले. कारण पाच सामन्यानंतर चेन्नईला विजय मिळवता आला, दुसरीकडे धोनी पूर्वीसारखा दमदार फटकेबाजी करताना दिसला. ऋषभ पंतच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखनौला 166 धावांचा डोंगर उभारता आला होता. यानंतर लखनौच्या संघाने त्यानंतर चेन्नईच्या संघाचा चांगले कोंडीत पकडले होते. पण धोनी आणि दुबे जोडीने चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नईने यावेळी लखनौच्या संघावर पाच विकेट्स राखून विजय साकारला.

Advertisement

लखनौच्या 167 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना चेन्नईला दमदार अर्धशतकी सलामी मिळाली. पदार्पण करणाऱ्या शेख रशिदने यावेळी सहा चौकारांच्या जोरावर 27 धावा केल्या, तर रचिन रवींद्रने 37 धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच चेन्नईची सुरुवात चांगली झाली. पण हे दोघे बाद झाले, त्यानंतर राहुल त्रिपाठीही (9) लवकर बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजाही सात धावांवर बाद झाला आणि चेन्नईचा संघ अडचणीत सापडला होता. पण विजय शंकरने आल्यावर पहिल्याच चेंडूवर चौकार खेचला आणि दडपण दूर केले. पण तोदेखील 9 धावांवर आऊट झाला. यानंतर शिवम दुबे व धोनीने संघाचा डाव स ावरला आणि नंतर 19.3 षटकांत विजय देखील मिळवून दिला. या जोडीने 67 धावांची भागीदारी साकारली. दुबेने 37 चेंडूत 3 चौकार व 2 षटकरासह नाबाद 43 तर धोनीने 11 चेंडूत नाबाद 26 धावांचे योगदान दिले. लखनौकडून रवि बिश्नोईने सर्वाधिक 2 गडी बाद केले.

घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचा धक्का

प्रारंभी, चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  लखनौची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मॅरक्रम 6 धावा काढून माघारी परतला तर स्टार फलंदाज निकोलस पूरनला 8 धावा करता आल्या. यामुळे चेन्नईने लखनौची 2 बाद 23 अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर लखनौच्या संघाने धावांची गती वाढवण्यावर भर दिला. मिचेल मार्शने 30 धावांची खेळी साकारली, तर पंत हा खेळपट्टीवर ठाण मांडून होता. पंत सुरुवातीला सावधपणे खेळत होता. कारण चेंडू हा बॅटवर संथपणे येत होता, त्यामुळे पंतने या खेळपट्टीवर थांबून खेळण्याचे ठरवले आणि त्याचा चांगलाच फायदा त्याला झाला होता. पंतने यावेळी 49 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 63 धावांची खेळी साकारली. पंतच्या या खेळीच्या जोरावर लखनौच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना 166 धावा करता आल्या. याशिवाय, आयुष बडोनीने 22 तर समादने 20 धावा केल्या.  पण, ही धावसंख्या घरच्या मैदानावर कमी पडली. चेन्नईने हे विजयी लक्ष्य पाच गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत विजयाला गवसणी घातली.

संक्षिप्त धावफलक

लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 7 बाद 166 (मॅरक्रम 6, मिचेल मार्श 30, पूरन 8, ऋषभ पंत 49 चेंडूत 63, बडोनी 22, ओव्हर्टन व पथिराना प्रत्येकी दोन बळी, खलील व अंशुल प्रत्येकी 1 बळी) चेन्नई 19.3 षटकांत 5 बाद 168 (रशीद 27, रचिन रविंद्र 37, शिवम दुबे नाबाद 43, एमएस धोनी नाबाद 26, रवि बिश्नोई 2 बळी, दिग्वेश व मॅरक्रम प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.