चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धा 16 जुलैपासून
गुकेशसह अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग
वृत्तसंस्था/ चेन्नई,
16 ते 22 जुलै दरम्यान येथे होणाऱ्या ‘चेन्नई ग्रँड मास्टर्स‘च्या चौथ्या आवृत्तीत विश्वविजेता डी. गुकेश, अर्जुन एरिगेसी आणि माजी ‘वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन‘ नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह यांसारखे आघाडीचे खेळाडू सहभागी होणार आहेत.
75 लाख रुपयांची बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धेतून ‘फिडे सर्किट‘चे महत्त्वपूर्ण गुणही मिळवता येणार आहेत, जे खेळाडूंना पुढील ‘कँडिडेट्स टूर्नामेंटसाठी पात्र ठरण्याच्या शर्यतीत उपयुक्त ठरतील. वर नमूद केलेल्या
ग्रँडमास्टर्सव्यतिरिक्त, या स्पर्धेत ‘ग्रँड चेस टूर‘चे दोनवेळा विजेते ठरलेले अलीरेझा फिरौजा, 2026 चे ‘बुलेट बुद्धिबळ‘ चॅम्पियन निहाल सरीन, ‘कँडिडेट्स‘ स्पर्धेतील माजी स्पर्धक दिमित्री आंद्रेकिन, अमेरिकन ग्रँडमास्टर हॅन्स नीमन आणि गेल्या वर्षीचे ‘चॅलेंजर्स‘ विजेते प्रणेश एम. हे खेळाडूही सहभागी होणार आहेत.
‘जगातील सर्वोत्तम खेळाडूंना अभिमान वाटेल अशी स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा संकल्प प्रत्येक आवृत्तीसोबत अधिक दृढ होत आहे; त्याचबरोबर भारतीय प्रतिभेला जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळून स्वताची क्षमता तपासण्याची महत्त्वपूर्ण संधीही यातून निर्माण होत आहे, असे स्पर्धेचे संचालक मनू गुर्टू यांनी सांगितले. या स्पर्धेत पहिल्यांदाच ‘ओपनिंग मूव्ज फोटोस्लॉट‘ तिकीट सादर केले जाणार आहे. यामुळे चाहत्यांना त्यांचे फोन आणि कॅमेरे घेऊन स्पर्धा कक्षात प्रवेश करण्याची आणि जगातील काही दिग्गज बुद्धिबळपटूंचे चित्रीकरण करण्याची विशेष संधी मिळणार आहे.