चेन्नईचा सामना आज उत्साह वाढलेल्या पंजाबशी
वृत्तसंस्था/ चेन्नई
सातत्यपूर्ण कामगिरी न करता आलेल्या चेन्नई सुपर किंग्जला आज बुधवारी येथे त्यांच्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यात पंजाब किंग्जचा सामना करताना अष्टपैलू कामगिरी करून दाखवावी लागेल. सुपर किंग्जचे नऊ सामन्यांतून 10 गुण झाले आहेत, जे लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सइतकेच आहेत. गतविजेते चेन्नई आज विजय मिळवून या कोंडीतून बाहेर पडू पाहतील.
तथापि, पंजाब किंग्जने नुकताच बजावलेला पराक्रम हा चेन्नईसाठी चिंतेचा विषय असेल. पंजाबचे नऊ सामन्यांतून सहा गुण झाले आहेत. ते कोलकाता नाईट रायडर्सविऊद्ध 262 धावा काढल्यानंतर वाढलेल्या उत्साहानिशी या सामन्यात उतरणार आहेत. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात आजवर इतके मोठे लक्ष्य कुणाला गाठता आले नव्हते. पण चेपॉकची खेळपट्टी गोलंदाजांनाही मदत करते आणि हे मागील सामन्यात चेन्नईने सनरायझर्सवर मिळविलेल्या 78 धावांच्या प्रभावी विजयातून स्पष्ट झाले आहे.
पंजाबविऊद्धच्या सामन्यातही सर्वांच्या नजरा कर्णधार ऋतुराज गायकवाडवर असतील. गायकवाडने त्याच्या मागील दोन डावांमध्ये 108 आणि 98 धावा केल्या आहेत आणि न्यूझीलंडचा खेळाडू डॅरिल मिशेलनेही हैदराबादविऊद्ध 32 चेंडूंत 52 धावा करून योग्य वेळी आपला फॉर्म परत मिळवला आहे. तथापि, सीएसकेची खरी शक्ती शिवम दुबे आहे, ज्याने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येत प्रतिस्पर्धी गोलंदाजांना झोडून काढले आहे. दुबेने आतापर्यंत 350 धावा केल्या आहेत, गायकवाडच्या 447 धावांच्या मागे तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तथापि, सीएसकेचे सलामीचे समीकरण थोडे गडबडले आहे. गायकवाड चमकलेला असला, तरी आता वगळण्यात आलेला रचिन रवींद्र आणि अजिंक्य रहाणे हे दोघेही कर्णधाराला मदत करण्याची भूमिका योग्यपणे बजावू शकलेले नाहीत. दुसरीकडे, पंजाब आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी आणि सध्याच्या आठव्या स्थानावरून आणखी झेप घेण्यासाठी उत्सुक असेल. त्यासाठी त्यांच्या फलंदाजांना पुन्हा एकदा एकजुटीने प्रभावी कामगिरी करणे आवश्यक आहे. याची प्रामुख्याने जबाबदारी केकेआरविरुद्ध शतक नोंदविलेल्या जॉनी बेअरस्टोवर तसेच शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांच्यावर असेल. दुसरीकडे, कागिसो रबाडा, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि सॅम करन यासारखे अनुभवी खेळाडू असूनही त्यांचा गोलंदाजी विभाग थोडा डळमळीत दिसत आहे. त्यांना फिरकीपटू हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांच्याकडूनही अधिक चांगल्या कामगिरीची गरज आहे.
संघ : चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एम. एस. धोनी अरावेली अवनीश, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, आर. एस. हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जाधव मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, निशांत सिंधू, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रेहमान, मथीशा पाथिराना, सिमरजित सिंग, प्रशांत सोळंकी, शार्दुल ठाकूर, महीश थीक्षाना आणि समीर रिझवी.
पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम करन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसोव्ह.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.