चेन्नई चेस ग्रँडमास्टर्स : अर्जुन एरिगेसीची विदित गुजराथीवर मात
वृत्तसंस्था/ चेन्नई
अर्जुन एरिगेसी त्याच्या ऐतिहासिक 2800 एलो रेटिंगनंतरच्या त्याच्या पहिल्या मायदेशातील बुद्धिबळ स्पर्धेत जोरदार कामगिरी करताना विदित गुजराथीवर पाच तासांच्या चुरशीच्या लढतीनंतर मात केली. चेन्नई बुद्धिबळ ग्रँड मास्टर्स, 2024 ची ही पहिली फेरी येथे झाली.
अर्जुन आता गतवर्षीचा विजेता डी. गुकेशविरुद्ध या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे लक्ष्य बाळगून असेल. गुकेशने याच स्पर्धेतील विजयाचा वापर करून कँडिडेट्स स्पर्धेत मजल मारली होती आणि नंतर जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत स्थान मिळविण्यात यश प्राप्त केले होते. चेन्नई बुद्धिबळ ग्रँड मास्टर्स, 2024 मध्ये मास्टर्स आणि चॅलेंजर्स या दोन श्रेणी असून 2729 च्या सरासरी रेटिंगसह मास्टर्स गट यावेळी अधिक स्पर्धात्मक आहे. उगवत्या खेळाडूंसाठी चॅलेंजर्सची रचना केलेली असून उदयोन्मुख भारतीय प्रतिभेला उच्च श्रेणीच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळावी यासाठी ही सोय करण्यात आली आहे.
‘मायक्रोसेन्स’चे माजी व्यवस्थापकीय संचालक कैलासनाथन स्वामीनाथन यांनी विदित आणि अर्जुन यांच्यातील सामन्यात औपचारिकपणे पहिली चाल करून अधिकृतपणे स्पर्धेची सुऊवात केली. विदितने पांढऱ्या सोंगाट्यासह खेळताना किंग्स पॉन ओपनिंगसह आपला हल्ला सुरू केला. पण अर्जुनने नंतर सिसिलियन डिफेन्सच्या फ्रेंच व्हेरिएशनचा वापर करून प्रतिकार केला. दोन्ही ग्रँडमास्टर्समधील झुंज भरपूर रंगून शेवटी पाच तासांच्या खेळानंतर अर्जुनचे पारडे जड ठरले.
इतर लढतींत उदयोन्मुख भारतीय खेळाडू अरविंद चिदंबरमने 29 व्या क्रमांकावर असलेला जागतिक स्तरावरील इराणी ग्रँडमास्टर अमीन तबताबाईशी बरोबरी साधली, तर अमेरिकेच्या लेव्हॉन अरोनियनने सर्बियाच्या अॅलेक्सी सरानाबरोबरचा सामना बरोबरीत सोडविला. मॅक्सिम वॅचियर-लॅग्रेव्हने मात्र काळ्या सोंगाट्यांसह खेळताना परहम मगसूदलूवर विजय मिळवून आघाडीवर जाण्यात यश मिळविले. चॅलेंजर्स गटात रौनक साधवानी याने कार्तिकेयन मुरलीविऊद्ध विजय नोंदविला, तर लिओन मेंडोन्साने वैशाली आर. वर, व्ही. प्रणवने हरिका द्रोणवल्लीवर आणि अभिमन्यू पुराणिकने एम. प्रणेशविऊद्ध विजय मिळवला.