इस्रायलमधील रसायन प्रकल्प उद्ध्वस्त
इराणकडून भीषण हल्ला : गॅसगळतीचा धोका
इराणच्या एका बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा तुकडा इस्रायलच्या दक्षिण हिस्स्यातील एका रसायन प्रकल्पाला धडकून तेथे भीषण आग लागली आहे. हा प्रकल्प बियरशेबा शहराच्या दक्षिणेस स्थित नेओत होवाव औद्योगिक भागात आहे. हा एडीएएमए कंपनीचा मखतेशिम प्रकल्प असून तो कीटकनाशक आणि पीक सुरक्षेशी निगडित रसायनांची निर्मिती करतो. चिनी कंपनी सिंजेंटा समुहाच्या या प्रकल्पावर क्षेपणास्त्राचा तुकडा कोसळला आणि रसायनांच्या टँकर्सना आग लागली आहे.
आग लागताच इस्रायली सैन्याच्या होम फ्रंट कमांडने आसपासच्या लोकांना घरातच थांबण्याचा इशारा जारी केला, कारण विषारी धूर फैलावण्याचा धोका होता. अग्निशमन दल आणि बचावपथकांनी अनेक तासांच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले आणि नुकसान झालेल्या रसायन टँकर्सना सील केले. परंतु गॅस गळतीचा धोका वाढला आहे. गॅसगळती पूर्ण क्षेत्रात फैलावल्यास मोठी हानी होण्याची भीती आहे.
बियरशेबामध्ये आणखी एक क्षेपणास्त्र हल्ला
प्रकल्पाच्या घटनेच्या काही वेळानंतर इराणने आणखी एक क्षेपणास्त्र डागले, जे बियरशेबा शहराच्या खुल्या भागात कोसळले. याचा स्फोट अत्यंत मोठा असल्याने आसपासच्या सुमारे 100 घरांच्या काचा तुटल्या आहेत आणि अनेक घरांचे मोठे नुकसान झाल्याने लोकांना अन्यत्र आश्रय घ्यावा लागला आहे. क्षेपणास्त्राच्या स्फोटानंतर त्याचे तुकडे इतरत्र फैलावल्याने 11 जण जखमी झाले आहेत. या जखमींना सोरोका मेडिकल सेंटरमध्ये हलविण्यात आल्याचे मेगन डेव्हिड एडोम म्हणजेच इस्रायलच्या रुग्णवाहिका सेवेने सांगितले आहे.
इराणकडून 8 वेळा हल्ले
इराणने रविवारी रात्री एकूण 8 वेळा क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. जेरूसलेम आणि मध्य इस्रायलच्या दिशेने आलेल्या एका क्षेपणास्त्राला आकाशातच नष्ट करण्यात आले. उत्तर इस्रायलच्या डागण्यात आलेले क्षेपणास्त्र जाणूनबुजून खुल्या मैदानात कोसळू दिले गेले. तर दक्षिण भागाच्या दिशेने डागण्यात आलेले इराणचे क्षेपणास्त्र इंटरसेप्ट करण्यात आले आहे.