कॅलिफोर्नियात डिस्नेलँडनजीक रसायन गळती
विषारी वायू-टँक फुटल्याने धोका : 40 हजार लोकांचे स्थलांतर
वृत्तसंस्था/ गार्डन ग्रोव
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात रसायनाची टाकी फुटल्याने रसायनांची गळती झाली आहे. डिस्नेलँड थीम पार्कपासून एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावरील एअरोस्पेस फॅक्ट्रीत ठेवण्यात आलेला केमिकल टँक शुक्रवारी ओव्हरहीट झाला. यानंतर आसपासच्या सुमारे 40 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. अनेक शाळा बंद करण्यात आल्या असून मदतशिबिरे सुरू करण्यात आली आहेत.
कॅलिफोर्नियाच्या ऑरेंज काउंटी येथील गार्डन ग्रोव शहरात ही घटना घडली आहे. तेथे जीकेएन एअरोस्पेस नावाच्या कंपनीत मिथाइल मेथाक्रिलेट नावाचे रसायन साठविणारा प्रेशराइज्ड टँक तप्त झाला आणि त्यातून विषारी वायूची गळती सुरू झाली. हा टँक फूटण्याची शक्यता असल्याचे ऑरेंज काउंटी फायर अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
प्लास्टिक निर्मितीसाठीचे रसायन
टँकमध्ये सुमारे 22,700 ते 26,500 लिटर प्लास्टिक निर्मितीसाठी वापरण्यात येणारे रसायन मिथाइल मेथाक्रिलेट भरलेले आहे. स्थिती गंभीर असून टँक फुटण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांना अफवा आणि अनावश्यक कॉलपासून वाचण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
6 शहरांमधील लोकांना हलविले
प्रारंभी केवळ गार्डन ग्रोवच्या लोकांना घर सोडण्याचा आदेश देण्यात आला होता, परंतु नंतर धोका वाढल्यावर ऑरेंज काउंटीतील आणखी 5 शहरे सायप्रस, स्टँटन, अनाहिम, बुएना पार्क आणि वेस्टमिंस्टरच्या काही भागांमधूनही लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. परंतु डिस्नेलँडचे दोन्ही थीम पार्क सध्या इवॅक्यूएशन झोनमध्ये सामील नाहीत. प्रशासनाने तीन हायस्कूल्समवेत तीन ठिकाणांवर निवारा केंद्रे स्थापन केली असून तेथे लोकांना ताप्तुरत्या स्वरुपात ठेवण्यात आले आहे. तर संबंधित कंपनी आपत्कालीन सेवा आणि तज्ञांसोबत मिळून स्थानिक लोक आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
टँकचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न
अग्निशमन दल ड्रोनच्या मदतीने सातत्याने टँकचे तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. खराब झालेल्या दोन टँकपैकी एक टँक दुरुस्त करण्यात आला आहे, परंतु दुसरा टँक अद्यापही मोठ्या धोक्याच्या स्थितीत आहे. सातत्याने पाणी आणि अन्य तंत्रज्ञानांच्या मदतीने टँकला थंड करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.