चेल्सीचा बेनफिकावर 4-1 ने विजय
वृत्तसंस्था/ शार्लोट, अमेरिका
ख्रिस्तोफर नकुंकूने अतिरिक्त वेळेत परत आलेल्या चेंडूवर गोल केला आणि चेल्सीसाठी बँक ऑफ अमेरिका स्टेडियमवर झालेल्या क्लब वर्ल्ड कप उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात बेनफिकावर 4-1 असा विजय मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला. विजेच्या कडकडाटांमुळे हा सामना दोन तास उशिरा झाला आणि पूर्ण होण्यास जवळजवळ पाच तास लागले.
फिलाडेल्फियामध्ये शुक्रवारी चेल्सीची पाल्मेरासशी उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडेल. पाल्मेरासने बोटाफोगोचा 1-0 असा पराभव केला. नकुंकूने 108 व्या मिनिटाला महत्त्वाचा गोल केला. जियानलुका प्रेस्टियानीला रेड कार्ड मिळाल्याने यावेळी बेनफिकाचा एक खेळाडू कमी होऊन 10 खेळाडूंनिशी खेळावे लागले होते. याप्रसंगी बॉक्सच्या डाव्या बाजूने मोइसेस कैसेडोचा डाव्या पायाने हाणलेला फटका गोलच्या मध्यभागी अॅनाटोलिट ट्रुबिनने वाचवला, परंतु नकुंकूने परत आलेला चेंडू गोलच्या उजव्या वरच्या कोपऱ्यात फटकावला. पेड्रो नेटो आणि किमन ड्युसबरी-हॉल यांनी अतिरिक्त वेळेत आणखी दोन गोल केले.
त्यापूर्वी रीस जेम्सने 64 व्या मिनिटाला फ्री किकवर गोल करून चेल्सीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. परंतु चार मिनिटे शिल्लक असताना विजेच्या कडकडाटामुळे सामना थांबवण्यात आला आणि दोन तास उशीर झाला. जेव्हा संघ परतले तेव्हा स्टॉपेज वेळेत चेंडू मालो गुस्टोच्या हाताला आदळल्याने हँडबॉल देण्यात आला. यावेळी एंजेल डी मानाने पेनल्टीचे रूपांतर गोलात करून सामन्यात बेनफिकाला बरोबरी साधून दिली.
दुसरीकडे, पॉलिन्होने अतिरिक्त वेळेत दोन बचावपटूंमधून वाट काढत केलेल्या गोलमुळे ब्राझिलियन लीग प्रतिस्पर्धी बोटाफोगोवर 1-0 असा विजय मिळवून पाल्मिरासला क्लब वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करता आला. ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात एकदा झळकलेल्या पॉलिन्होने 100 व्या मिनिटाला उजव्या विंगमधून ड्रिबलिंग करत मुसंडी मारून गोलच्या खालच्या डाव्या कोपऱ्यात डाव्या पायाने फटका हाणला. बोटाफोगोने शेवटच्या मिनिटांत बरोबरीच्या अनेक संधी निर्माण केल्या, पण त्यांना गोल करता आला नाही. लिंकन फायनान्शियल फील्डवरील हा सामना आक्रमक फुटबॉलने भरलेला होता, ज्यामध्ये गोलवर एकत्रितपणे 35 फटके हाणले गेले.