7 दशकांनी भारतातील जंगलांमध्ये दिसणार चित्ता
नामीबिया या आफ्रिकेतील देशासोबत करार : मध्यप्रदेशातील जंगलात 8 चित्त्यांना सोडले जाणार
नवी दिल्ली : 1952 मध्ये विलुप्त घोषित करण्यात आलेल्या चित्त्यांना देशात पुन्हा आणण्यासाठी भारताने नामीबिया या आफ्रिकेतील देशासोबत बुधवारी एका महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी केली आहे. ऑगस्टमध्ये नामीबियामधून 8 चित्त्यांना भारतात आणले जाणार आहे, यातील 4 नर आणि 4 मादी चित्ते असतील अशी माहिती पर्यावरण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेसोबत यासंबंधी देखील चर्चा सुरू आहे. मंजुरी मिळताच दक्षिण आफ्रिकेसोबत सहमती करारावर स्वाक्षरी केली जाणार आहे. जगातील सर्वात चपळ प्राणी म्हणून ओळख असणाऱया चित्त्यांना मध्यप्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात ठेवले जाणार आहे.
चित्ते भारतातून पूर्णपणे विलुप्त झाले आहेत. अधिक प्रमाणात शिकार होणे आणि अधिवास नसणे ही यामागची कारणे असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी 1948 मध्ये छत्तीसगडच्या (तत्कालीन अविभाजित मध्यप्रदेश) कोरिया जिल्हय़ातील जंगलामध्ये एक मृत चित्ता आढळून आला होता. जगात चित्त्यांची सर्वाधिक संख्या नामीबियात आहे.
मध्यप्रदेशच्या जंगलात या चित्त्यांना अधिवास मिळावा म्हणून पावले उचलण्यात आली आहेत. वन विभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱयांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर चित्त्यांना भारतीय वातावरणाशी जुळवून घेता येईल अशा दृष्टीने उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.