कुनो अभयारण्यात चित्त्याच्या पिल्लाचा मृत्यू
वृत्तसंस्था/ कुनो
कुनो राष्ट्रीय उद्यानात 10 महिन्यांच्या दक्षिण आफ्रिकन चित्त्याच्या पिल्लाचा मृतदेह आढळला आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी वीरा या मादी चित्त्यासह दोन पिल्लांना गुरुवारी कुनोच्या पारोंड परिसरातील मुक्त जंगलात सोडले होते. यातील एका पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी निदर्शनास आली. वन विभागाने या पिल्लाच्या मृत्यूची पुष्टी केली असून मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच कळेल असे सांगितले. प्राथमिक तपासात दुखापत, संघर्ष किंवा हल्ल्याचे कोणतेही चिन्ह आढळले नाही.
एका पिल्लाच्या मृत्यूमुळे कुनो राष्ट्रीय उद्यानात आता एकूण चित्त्यांची संख्या 28 झाली आहे. यामध्ये 8 प्रौढ चित्ते (5 मादी, 3 नर) आणि 20 भारतीय वंशाचे चित्ते समाविष्ट आहेत. सर्व चित्ते निरोगी असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली. वीरा आणि तिचे दुसरे पिल्लू पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. एक पथक उद्यानातील चित्त्यांच्या हालचाली आणि आरोग्यावर 24 तास लक्ष ठेवते, असे चित्ता प्रकल्पाचे फील्ड डायरेक्टर उत्तम कुमार शर्मा यांनी सांगितले.