For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावगाव मैदानात ‘माऊली’चा जयजयकार

10:08 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
सावगाव मैदानात ‘माऊली’चा जयजयकार
Advertisement

सावगाव कुस्ती मैदान : समिर शेख, उमेश चव्हाण, नागराज बशीडोणी, पार्थ पाटील, राहित पाटील यांचा प्रेक्षणीय विजय

Advertisement

बेळगाव : सावगाव येथे जय हनुमान कुस्तीगीर संघटना, मराठी संघटक बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कै. सुरेश अंगडी व कै. परशराम सावगाव आयोजित केलेल्या भव्य कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटेने मिलाद इराणला 11 व्या मिनिटाला घुटणा डावावर चारीमुंड्या चीत करुन उपस्थित 25 हजारहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकली. रामचंद्र मन्नोळकर, मारुती काकतकर, विनय कदम व हनुमान कुस्तीगीर संघटना सावगाव यांच्या हस्ते प्रमुख कुस्ती माऊली कोकाटे व मिलाद इराण यांच्यात लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्याच मिनिटाला माऊली कोकाटेने पायाला चाट मारुन मिलाद इराणला खाली घेण्याचा प्रयत्न केला. पण मिलादने त्यातून सुटका करुन घेतली. 6 व्या मिनिटाला हप्ते भरुन माऊली कोकाटेला चीत करण्याचा प्रयत्न मिलाद इराणने केला. बलदंड शरीराच्या माऊलीने त्यातून सुटका करुन घेतली. 9 व्या मिनिटाला एकेरी पट काढून माऊली कोकाटेने मिलाद इराणला खाली घेत कब्जा मिळविला व एकचाक मारण्याचा प्रयत्न केला. पण बलदंड शरीराच्या महदीला एकचाकावर फिरवणे कठीण गेले. त्यातच माऊलीने मानेवरील कस काढून घुटण्यावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा हा प्रयत्न असफ झाला. पण 11 व्या मिनिटाला माऊली कोकाटेने घुटणा डावावरती चीतपट करुन उपस्थित कुस्तीशौकिनांची मने जिंकली.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उदयकुमार दिल्ली व समिर शेख ही कुस्ती सावगाव कुस्तीगीर संघटना यांच्या हस्ते लावण्यात आली. दुसऱ्याच मिनिटाला उदयकुमारने एकेरी पट काढून धक्का घिस्स्यावरती चीत करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण समिर शेखची पाठ जमिनीला न लागल्याने समिरने त्यातून खालून डंकी मारत उदयकुमारवर कब्जा मिळविला. उदयकुमारने त्या डावात दाबून ठेवले असते तर निश्चितच कुस्तीचा निकाल झाला असता. नंतर कुस्ती डावप्रतीडावाने झुंजली. वेळेअभावी कुस्ती गुणावरती निकाल करण्याचा निर्णय पंचांनी घेतला. कुस्ती सुरु झाली 4 थ्या मिनिटाला उदयकुमार पायाला आकडी घालून घिस्सा मारण्याचा प्रयत्न करीत असताना समिर शेखने लपेट मारुन उदयकुमारला चारीमुंड्या चीत केले. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कुस्ती समिक्षक कृष्णकांत चौगुले, पुंडलिक पावशे, प्रकाश पाटील, रुपेश पाटील, लखन कदम, शंकर घाटेगस्ती, राहुल पाटील व संदीप काकतकर आदी मान्यवरांच्या हस्ते अरुण बोंगाडे व उमेश चव्हाण ही कुस्ती लावण्यात आली. चौथ्या मिनिटाला उमेश चव्हाणने एकेरी पट काढून अरुण बोंगाडेला खाली घेतले व एकचाक मारुन घुटणा डावावरती चीत करुन वाहवा मिळविली. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत नागराज बशीडोणीने अवघ्या दीड मिनिटात संदीप हरियाणाला निकाल डावावरती चीत करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.

Advertisement

पाचव्या क्रमांकाची कुस्ती निखिल गणेशपूर व कमलजीत पंजाब ही कुस्ती डावप्रतीडावाने झुंजली. तर सहाव्या क्रमांकाची कुस्ती कामेश पाटील कंग्राळी व सुनील करवते या दोन्ही कुस्त्या वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आल्या. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत विक्रम शिनोळीने किरण जाधवचा एकचाक डावावरती पराभव केला. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत किर्तीकुमार काटेने पवन चिक्कदिनकोप्पचा एकचाक डावावर पराभव केला. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रेम कंग्राळीने संजू इंगळगीला केवळ 30 सेकंदात ढाकेवरती चीत केले. दहाव्या क्रमांकाच्या कुस्ती पृथ्वीराज कंग्राळी व लालू मोतीबाग ही कुस्ती डावप्रतीडावाने लढली गेली. पण वेळेअभावी बरोबरीत राहिली. प्रथमेश हट्टीकर कंग्राळीने अवनीश नातेपोतेचा घुटना डावावरती पराभव केला. कार्तिक इंगळगीने अशपाकचा एकलांगीवर पराभव केला. त्याचप्रमाणे ओमकार राशिवडे, अजित कंग्राळी, ओम कंग्राळी, तेजस कवटेपिरन, हनुमंत गंदीगवाड, शरण गुलबर्गा, अमर बंबर्गा, महांतेश संतीबस्तवाड, शुभम निट्टुर, चेतन येळ्ळूर, ओम कंग्राळी, शिवम मुतगा, साहिल कंग्राळी, हर्ष कंग्राळ, करण खादवाडी, यश कोरेगल्ली, ओमकार खादवाडी, भुमीपूत्र मुतगा, वैष्णव गुरव किणये, श्रीनाथ बेळगुंदी प्रताप खादरवाडी यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजय मिळवला.

आकर्षक कुस्तीत रोहित पाटील कंग्राळीने संदीपचा घिस्सा डावावरती प्रेक्षणीय विजय मिळविला. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पार्थ पाटील कंग्राळीने वरुण मठपती आखाड्याचा एकचाक डावावरती विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत रुपेश कर्लेने उमेश शिरगुप्पी स्पोर्ट्स हॉस्टेल याला पराभव केले. मानाच्या गदेच्या कुस्तीत ओमकार सावगावने हरि मस्कोनट्टीचा निकाल डावावरती पराभव करुन गदेचा मानकरी ठरला. तर दुसऱ्या गदेच्या कुस्तीत अवधुत माळी गंगावेश कोल्हापूरने शिवलिग धारवाडचा घिस्सा डावावरती पराभव करुन गदेचे बक्षीस पटकाविले. कुस्तीसाठी पंच म्हणून संग्राम पोळ, रुपेश सावगाव, प्रशांत पाटील कंग्राळी, मालोजी येळ्ळूर, बबन येळ्ळूर, सिद्धराय चौगुले, गजानन पावशे, मारुती तुळजाई, प्रकाश तिर्थकुंडये, चेतन बुद्धण्णावर, मारुती घाडी, पुंडलिक मेणसे आदींनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे व पुंडलिक पावशे यांनी केले. तर कागलच्या हणमा गुले यांनी अपाल्या रणालगीच्या तालावर सर्व कुस्तीशौकिनांना खेळवून ठेवले. हे कुस्तीमैदान यशस्वी करण्यासाठी सावगाव कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :

.