बसेसमधील सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करा
कर्नुलजवळील बस दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांचे निर्देश : प्रवाशांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता
बेंगळूर : कर्नुलजवळील बस आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व परिवहन संस्थांच्या बसमधील सुरक्षा व्यवस्थेची काटेकोरपणे तपासणी करा, असे निर्देश परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी दिले आहेत. कर्नुल बस दुर्घटना ही अत्यंत दु:खद आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. यासाठी आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना देखील पाळल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. यापूर्वीही आपण परिवहन मंत्री असताना हावेरीजवळ एका खासगी बसमध्ये आग लागली होती आणि काही प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता.
त्यावेळी परिवहन संस्थेच्या बसेस, कॉन्ट्रॅक्ट गॅरेज बसेस, खासगी पर्यटक बसेस, टेम्पो ट्रॅव्हलर्स आणि शालेय वाहनांसह सुमारे 50,000 वाहनांमध्ये आपत्कालीन एक्झिट दरवाजे अनिवार्य करण्यासाठी आणि दरवाजे योग्यरित्या कार्यरत आहेत की नाही हे तपासण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली होती. परिणामी, अनेक बसेसमध्ये त्रुटी आढळून आल्याने आपत्कालीन एक्झिट दरवाजे बसवणे अनिवार्य झाले, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. बसेसमध्ये कोणताही व्यावसायिक माल किंवा सामान घेऊन जाताना ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थ वाहून नेऊ नयेत याची काळजी घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत खिडक्मया तोडण्यास मदत करण्यासाठी सर्व एसी बसेसमध्ये हातोडा अनिवार्य असावा. सामानाच्या जागेत कोणत्याही व्यक्तीला झोपू देऊ नये. बसेसच्या नूतनीकरणादरम्यान तपासणी अनिवार्य असावी, असे त्यांनी सांगितले.
त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करा
जर काही त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी. प्रवाशांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे. कोणत्याही प्रकारे जीवितहानी भरून काढू शकत नाही. तथापि, केएसआरटीसी, बीएमटीसीसह इतर कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक आणि परिवहन विभागाच्या सुरक्षा विभागाच्या आयुक्तांना बसेसच्या सुरक्षिततेची तपासणी करण्यासह योग्य कारवाई करण्यासाठी त्वरित पथके तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.