For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वडगावच्या शेतकरी महिलेची फसवणूक

11:15 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
वडगावच्या शेतकरी महिलेची फसवणूक
Advertisement

बँकेत खाते उघडण्याचे सांगून लुबाडणूक : शहापूर पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध एफआयआर

Advertisement

बेळगाव : रयत गल्ली, वडगाव येथील एका शेतकरी महिलेची फसवणूक करून तिच्या मालकीची शहापूर परिसरातील 1 एकर 15 गुंठे जमीन हडप केल्यासंबंधी शहापूर पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशीला विठ्ठल सांबरेकर (वय 67) रा. रयत गल्ली, वडगाव या वृद्धेने दिलेल्या फिर्यादीवरून अमित परशुराम धामणेकर, नागराज प्रकाश भैरण्णावर, रमेश अळवाणी, अमोल बाळेकुंद्री, सूरज रेडेकर, बाबू बजंत्री, गिरीश वस्त्रद, व्यंकटेश रेवणकर यांच्यावर 1 मे रोजी भादंवि 417, 465, 468, 420 कलमान्वये एफआयआर दाखल केला आहे. 28 जुलै 2020 रोजी पीकहानीची भरपाई जमा होणार आहे. त्यामुळे बँक अकौंट काढूया, असे सांगत आपल्याच नात्यातील अमित परशुराम धामणेकर याने येळ्ळूर रोड, वडगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आपल्या नावे अकौंट काढले. त्यानंतर काही कागदांवर आपल्या सह्या घेण्यात आल्या होत्या. येळ्ळूर येथील आपल्या एका नातेवाईकासंबंधीची जमीन विकायची आहे, यासाठी सही पाहिजे, असे सांगत काही कागदांवर सह्या घेऊन 4 डिसेंबर 2020 रोजी उपनोंदणी कार्यालयात नेऊन तेथेही सह्या घेण्यात आल्या. ही गोष्ट कोणालाही सांगू नका, अशी आपल्याला ताकीद करण्यात आली होती. अलीकडे आमच्या जमिनीसंबंधी उतारा काढल्यानंतर मालक म्हणून अमित परशुराम धामणेकर यांचे नाव आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे आपल्या लक्षात आले. आपल्या बँक खात्यात 30 लाख रुपये जमा करून वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे ते ट्रान्स्फर करण्यात आल्याचेही सुशीला सांबरेकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.