चव्हाट गल्लीवासियांचा मनपावर मोर्चा
विविध समस्या सोडविण्यासाठी दिले निवेदन
बेळगाव : चव्हाट गल्ली येथील रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. ड्रेनेज आणि पाण्याची समस्याही गंभीर बनली आहे. यामुळे चव्हाट गल्लीतील रहिवाशांनी मंगळवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढून निवेदन दिले. यावेळी तातडीने काम पूर्ण करा, अशी जोरदार मागणी रहिवाशांनी केली आहे. चव्हाट गल्ली येथून ड्रेनेज पाईपलाईन घालण्यात आली. त्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली. त्यानंतर पाण्याची पाईप लाईनही घालण्यात आली. त्यानंतर पुन्हा खोदाई करण्यात आली. त्यामुळे रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. ये-जा करणेदेखील अवघड झाले आहे. दुचाकी वाहने घसरून पडण्याचे प्रकारही वाढले आहेत. तेव्हा तातडीने त्या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. योग्य प्रकारे पाणीपुरवठा करण्याकडे एलअॅण्डटी कंपनीने दुर्लक्ष केले आहे. काही नळांना पाणीच येत नाही. तेव्हा पाण्याचा योग्य पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली. भटक्या कुत्र्यांचीही समस्या वाढली असून ही कुत्री दुचाकी वाहनांचे सीट कव्हर फाडत आहेत. याचबरोबर हल्लेही करत आहेत. तेंव्हा तातडीने कुत्र्यांचाही बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली. उपमहापौर रेश्मा पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुनील रजपूत, प्रगती बडवाण्णाचे, स्वप्नील जोगाणी, अरुण पवार, दिगंबर दमुणे, दीपक नंदगडकर, कल्पना जोगाणी यांच्यासह गल्लीतील नागरिक उपस्थित होते.