चव्हाण भाजपचे ‘संघ’नायक
भारतीय जनता पक्षाने पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड केली आहे. रविंद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्पित म्हणून ओळखले जातात. त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात होती. मंगळवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले, पक्षाचे केंद्रीय मंत्री आणि निवडणूक निरीक्षक किरण रिजिजू यांनी निवडीची घोषणा केली आणि मावळते अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविंद्र चव्हाण यांना अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवला. या निमित्ताने वरळी येथे पक्षाने टोलेजंग सभा, नव्या पक्षाध्यक्षाचा सत्कार, शक्तीप्रदर्शन आणि भाजप घरोघरी असा मनोदय व्यक्त केला. रविंद्र चव्हाण यांची निवड जाहीर झाली आणि ते बोलायला उठले तेव्हा कार्यकर्त्यांनी ‘चव्हाण तूम आगे बढो हम तूम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या पण या घोषणा थांबवत चव्हाण म्हणाले ‘चव्हाण नाही भाजप आगे बढो म्हणा’ यातून त्यांचे काम कसे चालणार, उद्दिष्ट काय? हे जसे स्पष्ट झाले तसे चव्हाण जमिनीवर पाय ठेवून चालत आहेत हे सुद्धा दिसून आले. रविंद्र चव्हाण हा नवा चेहरा असला तरी भाजपसाठी त्यांनी संघटनात्मक काम आणि भाजप महायुती एकनाथ शिंदे सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून कामगिरी केली आहे. भाजपची स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक पुनर्बांधणी सुरु आहे. लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाईल. त्यासाठी तीन चार नावांचा विचार सुरू आहे. भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आणि सदस्य नोंदणी असलेले राजकीय संघटन म्हणून ओळखले जाते. देशात महाराष्ट्र हा अनेक अर्थांनी महा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पक्षबांधणी, यश, सत्ता, प्रतिमा, सोशल इंजिनिअरिंग आणि टार्गेट याला अनन्यसाधारण महत्त्व असतं, नव्हे आहे. महाराष्ट्रात मुंबई महापालिकेसह, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीत रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. जोडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सारे मंत्री, पदाधिकारी यांचाही कस लागणार आहे. भाजप हा घराणेशाहीचा पक्ष नाही. तो राष्ट्रीय आणि सर्वांना सोबत घेऊन राजकारण करणारा पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाला जशी भव्यता आहे तशी या पक्षात कुणाही नवतरुणाला आपल्या कर्तृत्वावर मोठी संधी मिळते, हे स्पष्ट आहे. राजकारणात धनदांडगेपण, जातदांडगेपण आणि गॉडफादर लागतो, हे खरे असले तरी ते अंतिम सत्य नाही. या पलीकडे जाऊन, निष्ठा, ध्येयवाद आणि अथक काम या जोरावर पक्षात मोठी संधी मिळते, हे या निमित्ताने दिसून आले आहे. रविंद्र चव्हाण महाराष्ट्र प्रदेश भाजपचे बारावे अध्यक्ष आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे ते बावनकुळे यांच्यापर्यंत पक्षाचे प्रदेश अध्यक्ष झाले त्या प्रत्येकाचे पक्ष वाढीत मोठे योगदान आहे. शेटजी भडजीचा पक्ष या हेटाळणीतून भाजप कोसो मैल दूर गेला आहे. सामाजिक न्याय आणि समतोल राखत पक्षाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष अशी कामगिरी केली आहे. महाराष्ट्रात मराठा व ओबीसी यांना पक्षात, सत्तेत स्थान दिले आहे. सन 2002 मध्ये भाजयुमोचे ते कल्याणचे उपजिल्हाध्यक्ष होते. 2005 साली ते कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले. महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपद सांभाळत ते नव्याने झालेल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. पाठोपाठ चार निवडणुका त्यांनी जिंकल्या. ते मंत्रीमंडळात राज्यमंत्री होते. रायगड, पालघर, सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. भाजपचे प्रदेश महामंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांना कॅबिनेट मंत्री अशी बढती मिळाली तेव्हा ‘आनंदाचा शिधा’ ‘रेशन आपल्या दारी’ असे उपक्रम त्यांनी राबवले. ते कट्टर सावरकर भक्त आहेत आणि भाजपला महाराष्ट्रात मोठं यश मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रदेश अध्यक्षपद स्वीकारले आहे. शतप्रतिशत भाजप हा भाजपचा नारा आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजप सेनेला जनादेश मिळाला असताना जनादेश डावलून शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या महाआघाडीत उडी घेतली. त्यांची भाजपला तीव्र टोचणी आहे. राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो, हे खरे असले तरी ठाकरे यांनी मारलेली पलटी आणि केलेले शाब्दिक वार भाजपला पसंत पडलेले नाहीत. भाजप मुंबई महापालिका ताब्यात घेऊन हिशोब पुरता करण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच पदग्रहण मेळाव्यात भाजपचे शेलार यांनी चव्हाण विरोधकांचे राजकीय तेरावे घालतील, असे बोचरे उदगार काढले.
यंदाच्या दिवाळीच्या आसपास स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्ड टिकवण्यासाठी उद्धव व राज ठाकरे हे बंधू एकत्र येणार असे दिसते आहे. हे नवे ऐक्य झालेतर आणि विद्यमान महायुतीत जागावाटपाबाबत परस्परांचे समाधान झाले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काट्याची टक्कर दिसेल. भाजपने इनकमिंग दार उघडेच ठेवले आहे. एकनाथ शिंदे, अजितदादा पवारही लक्ष ठेऊन आहेत. अशावेळी मित्रपक्षांना सोबत ठेऊन मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणे सोपे नाही. पण चव्हाण कसलेले आहेत. पक्षासाठी वेळ देतात आणि कसून काम करत यश खेचून आणतात, असा त्यांच्याबद्दल भाजपमध्ये लौकिक आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवून दिले. लोकसभेला अपेक्षित यश आले नाही पण पाठपुरावा करण्यात, संघटना बांधण्यात ते वाकबगार ठरले आहेत. चव्हाण यांना मुख्यमंत्री जोडीला चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांचे पूर्ण समर्थन लाभणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शतप्रतिशत भाजप हे उद्दिष्ट पार होणार का? हा महत्त्वाचा प्रश्न असेल. संघाचा पाठिंबा, मुख्यमंत्री व भाजपचे सर्व पदाधिकारी व मंत्री चव्हाण यांच्यासोबत दिसत असल्याने अपेक्षा वाढत आहेत पण चव्हाण कट्टर व कणखर आहेत. ते यश खेचतील, असा भाजपला विश्वास आहे. नवे अध्यक्ष मैदानात उतरले आहेत. ते कशी खेळी करतात आणि भाजपला यश मिळवून देतात का, हे बघावे लागेल.