चौके येथे वनराई बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी श्रमदान
चौके | प्रतिनिधी : महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त चौके ग्रामपंचायतीच्या वतीने चौके सम्यक नगर येथे वनराई बंधारा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जलसंधारणाला चालना देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
चौके ग्रामपंचायत कार्यालयात गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती साजरी केल्यानंतर सरपंच शिवप्रसाद चौकेकर यांच्या हस्ते वनराई बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली. यावेळी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून बंधारा उभारण्याच्या कामात सहभाग घेतला.
पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण करणे आणि भविष्यातील पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी स्थानिक पातळीवर जलस्रोत सक्षम करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी युवराज चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, जयश्री कदम, पोलीस पाटील रोहन चौकेकर, आशा स्वयंसेविका सिद्धाली गावडे, अनिता चौकेकर, अंगणवाडी सेविका भारती सांडव यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी आणि चौके गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.