सर्पमित्राच्या उपचाराला दातृत्वाची गरज
सर्पदंश झाल्याने शस्त्रक्रियेचा खर्च मोठा
कोल्हापूर
बिळात शिरलेल्या विषारी सापाला पकडताना वडणगे (ता. करवीर) येथील प्रकाश कृष्णात गायकवाड (वय ३४) या सर्पमित्राला सर्पदंश झाल्याने त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सर्पदंश झालेल्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया झाली असून त्यावर अधिक उपचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी तीन लाखांच्या आसपास खर्च येणार आहे. सर्पमित्र गायकवाड यांची परिस्थिती बेताची आहे. त्यांच्या कुटुंबियांना हा खर्च न परवडणारा आहे. तरी समाजातील दानशूरांनी सढळ हातांनी सर्पमित्र गायकवाड यांना मदत करावी, असे आवाहन त्यांच्या कुटुंबियांनी केले आहे.
कृष्णात गायकवाड हे समाजसेवा म्हणून विनामुल्य साप पकडून देत होते. गेल्या २२ वर्षांपासून वडणगे येथील गायकवाड हे सर्पमित्र म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आजवर हजारो सापांना पकडून त्यांना सुरक्षितस्थळी सोडून जीवनदान दिले आहे.
गेल्या रविवारी गावातील पार्वती तलावाजवळ साप असल्याचा, त्यांना फोन आला. त्यानंतर प्रकाश यांनी तेथे जाऊन बिळात शिरलेल्या सापाला पकडले. पण रात्रीची वेळ असल्याने उजव्या हातात बॅटरी लावलेला मोबाईल आणि डाव्या हातात साप पकडला होता. दरम्यान, मोबाईल हातातून सटकल्याने अंधारात विषारी घोणस सापाने त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दंश केला. प्रकाश यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये आणले होते, परंतु तेथे उपचारात होणारी हयगय पाहून नातेवाइकांनी त्यांना त्वरीत खासगी दवाखान्यात हलविले. त्याच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया झाली असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
सर्प हाताळणारे सर्पमित्रसुद्धा निष्काळजीपणामुळे सर्पदंशाचे बळी ठरत असल्याच्या
अनेक घटना घडत आहेत. प्रकाशच्या वाट्यालासुद्धा हे संकट आले असून केवळ दैव बलवत्तर म्हणून जिवावरचे संकट टळले आहे. आता गरज आहे ती समाजातील दातृत्वाची उपचारासाठी येणारा खर्च अधिक असल्यामुळे त्यांना समाजाने सढल हाताने मदत करावी अशी भावना त्यांच्या मित्रांनी व्यक्त केली आहे. लोकांना भयमुक्त करणाऱ्या या सर्पमित्रालाच दंश झाल्यामुळे उपचारासाठी समाजाच्या दातृत्वाची गरज आहे.