धर्मादाय रूग्णालये निर्धन, दुर्बल रूग्णांसाठीच
कोल्हापूर / इम्रान गवंडी :
निर्धन व दुर्बल घटकातील रूग्णांना खासगी रुग्णालयांच्या तुलनेत कमी खर्चात चांगले उपचार मिळावेत, केवळ पैसे नसल्यामुळे कोणीही उपचारापासून वंचित राहू नये, या उद्देशाने सरकारने धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अधिपत्याखाली काही हॉस्पिटल आणली आहेत. त्याद्वारे धर्मादाय रुग्णालयांनी प्रत्येक विभागातील वैद्यकिय तपासणी व उपचार सवलतीच्या दराने द्यावयाचे आहेत. अशा हॉस्पिटल्सना ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950’ अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेवा-सुविधा देणे आवश्यक आहे. रूग्णांना समजण्यासाठी हॉस्पिटलच्या फलकावर ठळक अक्षरात धर्मादाय असे नाव लिहणे बंधनकारक आहे.
गरीब रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या उपचारांचा लाभ मिळवा, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र, तरीही मागील आठवड्यात धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अधिपत्याखाली पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेला पैसे जमा न केल्याने उपचार नाकारल्याचा प्रकार घडला. उपचार वेळेत न मिळाल्याने त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले. यावरून राज्यात बराच गदारोळ सुरू आहे. या प्रकरणामुळे धर्मादाय आखत्यारीत हॉस्पिटलकडुन सामान्य रूग्णांना दिली जाणारी रूग्णसेवा समोर आली.
कोल्हापूर जिल्ह्यातही एकूण 16 रूग्णगालये या योजनेच्या आखत्यारीत आहेत. धर्मादाय रुग्णालयांचा रुग्णांना अधिकाधिक फायदा व्हावा, यासाठी सरकारने तक्रार निवारण कक्ष आणि टोल-फ्री क्रमांकाची सुविधा सुरू केली आहे. उपचारात हयगय किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर स्वतंत्र चौकशी समिती नेमून कठोर कारवाईची तरतुद केली आहे. धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल रुग्णांवरती उपचार करण्यास कसुर केल्यास बागल चौक येथील धर्मादाय सह आयुक्त यांच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात लेखी तक्रार नोंदवावी, अशा सुचना कार्यालयाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
- रूग्णांलयांना शासकीय सवलतती
धर्मादाय अखत्यारित रूग्णालयांना शासकीय सवलती दिल्या जातात. यामध्ये जमीन नाममात्र भाड्याने, रुग्णालयांना जमीन, पाणी, वीज आणि करात सवलती मिळत असल्याने त्यांचा खर्च कमी होतो. याचा फायदा रुग्णांना कमी शुल्कात उपचारासाठी करणे बंधनकारक असते.
- 10 टक्के खाटा मोफत
धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या एकूण खाटांपैकी 10 टक्के खाटा पूर्णपणे मोफत आणि आणखी 10 टक्के खाटा सवलतीच्या दरात गरजू रुग्णांसाठी राखीव ठेवाव्या लागतात.
- उपचार नाकारण्यावर बंदी:
रुग्णालयांना आर्थिक कारणास्तव उपचार नाकारता येत नाहीत. जर असे आढळले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते, जसे की नोंदणी रद्द करणे किंवा दंड आकारणे.
- रुग्णांना द्याव्या लागणाऱ्या सुविधा
धर्मादाय रूग्णालयात गरीब रूग्णांना खाट, निवासी वैद्यकिय अधिकारी, शुश्रुषी, अन्न रुग्णालय जर पुरवित असेल, कापड, पाणी, वीज, सर्व साधारण विशेष उपचाराकरिता आवश्यक असलेल्या नित्य निदान विषयक सेवा व इतर सर्वसाधारण सेवा सवलतीच्या दरात द्याव्या लागतात.
- तक्रार निवारण
रुग्णांना कोणतीही तक्रार असल्यास ते स्थानिक महानगरपालिका, तालुका आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा परिषदेकडे तक्रार करू शकतात. कोल्हापूरात अशी यंत्रणा कार्यरत आहे, ज्यामुळे रुग्णांचे हक्क संरक्षित राहतात.
निर्धन रूग्ण : ज्या रुग्णाचे वार्षिक उत्पन 1 लाख 80 हजार रूपयांच्या आत आहे असे रूग्ण गरीब, निर्धन रुग्ण संबोधले जाते. अशा रुग्णांना वैद्यकिय तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत द्यावयाचे आहेत.
दुर्बल रूग्ण : ज्या रुग्णाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख 60 हजार रूपयांच्या आत आहे. अशा रुग्णांना दुर्बल रुग्ण संबोधले जाते. अशा रूग्णांना वैद्यकीय तपासणी व उपचार 50 टक्के सवलतीच्या दरात दिली जातात. उपयोगात आणलेल्या वस्तु व शरीराच्या आत लावलेल्या वस्तु यांचा आकार हा रुग्णालयांनी खरेदीच्या किंमतीत लावण्यात येते. आत लावलेल्या वस्तुची पन्नास टक्के किंमत द्यावी लागले.
- तक्रार आल्यास तत्काळ कारवाई
धर्मादाय अखत्यारित रूग्णालयांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल व निर्धन रूग्णांना शासनाच्या नियमानुसार उपचार देणे बंधनकारक असते. जिल्ह्यातील सर्व धर्मादाय रूग्णायलांकडून रोजच्यारोज राखीव खाटांची आकडेवारी वेबसाईटवरून घेतली जाते. 10 टक्के राखीव जागा ठेवल्याची खातरजमा केली जाते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रूग्णालयांची लेखी तक्रार आल्यास तत्काळ कारवाई केली जाईल.
शिवराज नाईकवाडे, अधिक्षक, धर्मादाय सह आयुक्त कार्यालय