‘लोकमान्य-लोककल्प’तर्फे प्रकाश कुबल-प्रशांत धोंड यांचा सत्कार
सेवाभावी-प्रेरणादायी कार्याची घेतली दखल
कुडाळ -
आपल्या सेवाभावी आणि प्रेरणादायी कार्यामुळे समाजात आदर्श स्थान निर्माण करणारे कुडाळ तालुक्यातील बिबवणे येथील लक्ष्मीनारायण विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व प्रगतशील शेतकरी प्रकाश कुबल तसेच माणगाव येथील वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाचे माजी प्राचार्य व प्रसिद्ध कीर्तनकार प्रशांत धोंड यांचा लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. कुडाळ शाखा आणि लोककल्प फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकमान्य कुडाळ शाखेत सत्कार करण्यात आला. समाजोपयोगी आणि प्रबोधनात्मक ,निस्वार्थी व प्रभावशाली कार्य करणाऱयांचा गौरव या दोन्ही संस्थांतर्फे केला जातो. कुडाळ तालुक्यातील माजी मुख्याध्यापक प्रकाश कुबल व माजी प्राचार्य प्रशांत धोंड यांची या गौरवशाली सत्कारासाठी निवड करण्यात आली. कुबल यांनी बिबवणे येथील लक्ष्मीनारायण विद्यालयाचे शिक्षक व नंतर मुख्याध्यापक पदाचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळला. शालेय प्रगती व विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी प्रयत्नशील राहिले. विद्यार्थ्यांना संस्कारक्षम करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. शिक्षण क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना प्रीतम महादेव प्रतिष्ठानचा ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार मिळाला आहे. त्यांना शेतीचीही फार आवड आहे. पारंपरिक भातशेती व अन्य पीक लागवड ते करतात. शेतकऱयांना मार्गदर्शन आणि ग्रामीण भागातील युवकांना दिशा देण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. धोंड हे माणगाव येथील वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झाले. शिक्षक म्हणून प्रामाणिक सेवा बजावली. त्याच विद्यालयातील प्राचार्य म्हणून त्यांनी प्रशालेच्या वाटचालीत महत्वाचे योगदान दिले. आपल्या प्राचार्यपदाच्या कारकिर्दीत त्यांनी विद्यालयात अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवून प्रशालेचा दर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला. ते राष्ट्रीयस्तरावरील कीर्तनकारही आहेत. शास्त्रीय गायन, भजन व कीर्तनाच्या माध्यमातून आपली संस्कृती ते जोपासत आहेत. गायन कलेत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. कीर्तनाद्वारे त्यांनी समाजप्रबोधन आणि संस्कृती संवर्धनासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. अध्यापन क्षेत्रात त्यांची प्रदीर्घ सेवा तसेच अध्यात्म व सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपल्या ज्ञानदीप सतत प्रज्वलित ठेवला आहे. त्यांचे हे कार्य प्रशंसनीय आहे. या दोन्हींचा गौरव सोहळा लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या कुडाळ शाखेत आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक बी. एन. पांडव, क्षेत्रीय व्यवस्थापक प्रवीण यादव, कुडाळ शाखा व्यवस्थापक ऋषिकेश सामंत, असिस्टंट मार्केटिंग मॅनेजर मयुर पिंगुळकर, सीएसआर असिस्टंट गौरी जुवेकर, मार्केटिंग मॅनेजर साक्षी मयेकर, असिस्टंट मॅनेजर युगा माळगावकर, सिनियर असिस्टंट स्मिता ठाकुर, असिस्टंट नारायण सामंत, सूर्यकांत गावडे, भानुदास वालावलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन मयुर पिंगुळकर यांनी केले.