For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेनकनहळ्ळी येथे रथ मिरवणूक भक्तिभावाने

11:19 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेनकनहळ्ळी येथे रथ मिरवणूक भक्तिभावाने
Advertisement

लक्ष्मीमूर्ती गदगेवर विराजमान : वरुणराजाची रथ-यात्रेकरूंवर पर्जन्यवृष्टी : भगवे फेटे, भगवे झेंडे-भंडारा उधळणीत जयजयकार

Advertisement

वार्ताहर /हिंडलगा

बेनकनहळ्ळी येथील लक्ष्मीयात्रेच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. मंगळवार दि. 23 रोजी अयोध्यानगर, जुनी गल्ली, सरस्वतीनगर, ज्योतीनगर, रामतीर्थनगर, क्रांतीनगर या भागातून मोठ्या भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी मूर्तीचे स्वागत महिलांनी भंडाऱ्याची उधळण करून केले. सूर्य मावळतीला आल्यानंतर ट्रॅक्टर मिरवणूक बेनकनहळ्ळी येथे आली. त्यामधील मूर्ती पुन्हा रथात विराजमान करण्यात आली. बुधवारी 24 रोजी सकाळी 9 वाजता रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन रथ ओढला. ही मिरवणूक सुभाष गल्ली मार्गावरून पुन्हा लक्ष्मी मंदिरजवळून ब्रह्मलिंग गल्लीमार्गे राजवाड्याच्या रूपात उभारण्यात आलेल्या शामियान्यापर्यंत आली. बेळगाव तालुक्यामध्ये अशा प्रकारचे एकमेव मोठे पटांगण येथे असल्याने भाविकांना व यात्रेकरूंना कोणतीही अडचण आली नाही.

Advertisement

गावातील ब्रह्मलिंग गल्ली व सुभाष गल्ली येथे प्रथेप्रमाणे देवीला मान देण्यात आला. वरुणराजाने याची दखल घेऊन रथावर व यात्रेकरूंवर पर्जन्यवृष्टी केली. त्यामुळे तप्त उन्हात रथ ओढून थकलेल्यांवर गारवा मिळून त्यांच्यात जोश आला. यावेळी पारंपरिक वेशभूषेत युवक, युवती, महिला व यात्रा कमिटी, देवस्की पंच, आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महिलांनी भगव्या साड्या परिधान केल्या होत्या. युवक भगवे फेटे, भगवे झेंडे व भंडाऱ्याची उधळण करत देवीच्या जयजयकारात तल्लीन झाले होते. मंडपाला आकर्षक रोषणाई केली होती. याठिकाणी खेळण्यांची दुकाने, नारळ, हार, पाळणे व मोठे स्टॉल होते. वडगाव ग्रामीण व कॅम्प पोलीसस्थानकांमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वतंत्र सेक्युरिटीमार्फत मिरवणुकीवर व परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकंदरीत यात्रा कमिटी, ग्रामस्थ, आजी-माजी लोकप्रतिनिधी व महिलावर्ग यांनी रथोत्सव मिरवणूक अत्यंत शांततेत शिस्तबद्धरीत्या काढण्यासाठी परिश्रम घेतले. पै-पाहुण्यांनी गावात हजेरी लावल्यामुळे सर्वांच्या घरांतून आनंदी वातावरण पसरले आहे.

चांदीचे अलंकार सुपूर्द

सरस्वतीनगर भागातील महिलांकडून चांदीचे अलंकार यात्रा कमिटीकडे सुपूर्द केले. यावेळी सुजाता पाटील, अंजना मंडलिक, सुरेखा मेणसे, सायराबानो हुक्केरी, हेमलता देसाई, रेखा देसाई, गणपत देसाई, पुंडलिक पाटील, भैरू बेळगावकर, रमेश चौगुले, सूरज पाटील, महेश मंडलिक आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.