‘फातोर्डा ते लंडन कनेक्शन’ घोटाळाप्रकरणी आरोपपत्र
मडगाव : ‘फातोर्डा ते लंडन कनेक्शन’ या टोपण नावाने ओळखण्यात येत असलेल्या सुमारे 100 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी गोवा पोलिसानी मडगावच्या सत्र न्यायालयात पहिले आरोपपपत्र काल मंगळवारी सादर केले. या प्रकरणात मायरन रॉड्रिग्स (फरारी) व दीपाली परब संशयित आरोपी म्हणून उल्लेख आहे. गोवा पोलिस खात्याच्या इकॉनॉमिक ऑफेन्सेस सेल पोलिसांनी मडगावच्या न्यायालयात हे आरोपपत्र सादर केले आहे. या प्रकरणात अनेक मालमत्ता जप्त करण्यात आलेल्या असून संशयित आरोपी मायरन रॉड्रिग्स (फरारी) व दीपाली परब संशयित आरोपी म्हणून उल्लेख आहे.
लूक आऊट नोटिस जारी
संशयित आरोपी मायरन रॉड्रिग्स यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी करण्यात आलेली असून लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवरही नोटिस जारी करणार असल्याचे म्हटले आहे. नावेली - मडगाव येथील आयवॉन सुरेश ज्योकीम आल्मेदा (60) हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. या दोन्ही आरोपीनी तक्रारदाराला तसेच इतर अनेक गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आणि या संशयित आरोपीनी गुंतवणुकदारांची रक्कम आपले जीवन ऐष आरामात जगण्यासाठी खर्च केली. त्यासाठी या प्रकरणातील संशयित आरोपीनी अनेक कंपन्या स्थापन केल्या, अनेक बँक खाती तयार केली आणि त्यातून आर्थिक व्यवहार केल्याचे तपास यंत्रणेने केलेल्या तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी मायरन रॉड्रिग्स (फरारी) व दीपाली परब यांनी 25 ते 45 टक्के परतावा मिळेल म्हणून तक्रारदाराला शॅअर मार्केटमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आणि सुमारे 1.19 कोटी रुपये परत देण्याचे वचन दिले. मात्र ही पूर्ण रक्कम देण्यास संशयित आरोपी अपयशी ठरल्याने तक्रारदाराने ही तक्रार केली होती. या एकंदर प्रकरणासंबंधी या पोलिसांनी संशयित आरोपी मायरन रॉड्रिग्स यांच्या नावावर असलेला 1 विला व 1 फ्लॅट ‘ब्लॉक’ केलेला आहे, संशयित आरोपी मायरन रॉड्रिग्स यांची पहिली पत्नी सुनिता रॉड्रिग्स यांच्या नावे असलेले 3 फ्लॅट ‘ब्लॉक’ केलेले आहेत, त्याचप्रमाणे 1.94 लाख रक्कम असलेली बँक खाती गोठविण्यात आलेली असल्याचे तपास यंत्रणेने म्हटलेले आहे. या प्रकरणातील दुसरी संशयित आरोपी दीपाली परब हिला तपास यंत्रणेने नोटीस पाठवलेली असून सध्या ती फरारी असल्याचे तपास यंत्रणेने म्हटलेले आहे.