For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मायरन रॉड्रिग्सविरुद्ध आरोपपत्र

12:12 PM Feb 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
मायरन रॉड्रिग्सविरुद्ध आरोपपत्र
Advertisement

‘फातोर्डा ते लंडन कनेक्शन’ : तब्बल 21 कोटींचा घोटाळा

Advertisement

मडगाव : ‘फातोर्डा ते लंडन कनेक्शन’ या टोपण नावाने ओळखण्यात येत असलेल्या सुमारे 20.83 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गोवा पोलिसानी मडगावच्या सत्र न्यायालयात 1163 पानी आणखी आरोपपत्र सादर केले असून या खटल्यात फरारी मायरन  रॉड्रिग्जसह एकूण 8 संशयित आरापींची नावे आहेत. या प्रकरणात किरभाट-नुवे येथील व सध्या फरारी असलेला संशयित आरोपी मायरन रॉड्रिग्ज, त्याची पहिली पत्नी सुनिता भगवंत तन्नाई उर्फ सुनिता रॉड्रिग्ज तसेच त्याची पत्नी संशयित आरोपी दीपाली परब उर्फ रुक्ममीणी नाईक यांचा या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून उल्लेख आहे. मायरन रॉड्रिग्ज हा फरारी असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. संशयित आरोपी सुनिता रॉड्रिग्स हिला 7 डिसेंबर 2024 रोजी अटक करण्यात आली होती आणि 26 डिसेंबर 2024 रोजी सत्र न्यायालयाच्या आदेशावरुन जामिनावर सोडण्यात आले.

संशयित आरोपी दीपाली परब उर्फ रुक्ममीणी नाईक हिला 4 मार्च 2025 रोजी अटक करण्यात आली होती आणि सत्र न्यायालयाच्या आदेशावरुन 17 ऑक्टोबर 2025 रोजी अनेक अटी घालून जामिनावर सोडण्याचा न्यायालयाने आदेश दिला होता. त्याचप्रमाणे फातोर्डा येथील नोलान आंताव (34), कोरगाव- पेडणे येथील 54 वर्षीय सुशांत घोडगे, ओरस सिंधदुर्ग येथील विजय दत्तात्रय जोयल (54), पुलवाडा - बाणावली येथील 54 वर्षीय नवनीक मारियो पेरेरा आणि घोगळ-मडगाव येथील ज्योकीम पिरीस (49) हे या प्रकरणातील इतर संशयित आरोपी आहेत. मात्र, नोलान आंताव, सुशांत घोडगे, विजय दत्तात्रय जोयल आणि नवनीक मारियो परेरा यांच्याविरुद्ध पुरावा नसल्याचे, न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटलेले आहे.

Advertisement

आपण गुंतवणूक सल्लागार असल्याचे भासवून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा देऊ असे सांगून या प्रकरणातील पहिल्या तीन संशयित आरोपींना अनेक गुंतवणूकदारांकडून सुमारे 20,83,90,336 इतकी रक्कम जमा केली आणि गुंतवणूकदारांच्या तोंडाला पाने पुसली असे न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटलेले आहे. तत्पूर्वी, संशयित आरोपी मायरन याने गुंतवणूकदारांना धनादेश दिले होते. मात्र, बँकेत अपुरा निधी असल्यामुळे हे धनादेश न वटल्याने पहिल्या तीन संशयित आरोपींनी अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती असे न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटलेले आहे. वरील गैरकृत्याप्रकरणी रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी वरील संशयित आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 406, 420, 120 -ब तसेच गोवा प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपोझिटर्स अॅक्ट-1999च्या 3 व 5 कलमाखाली गुन्हा नोंद करुन मडगावच्या न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. या खटल्याची सुनावणी आता लवकरच मडगावच्या न्यायालयात होणार आहे.

Advertisement
Tags :

.