यादव कुटुंबाविरोधात आरोपनिश्चिती
यादव कुटुंबाविरोधात आरोपनिश्चिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नोकरी देण्यासाठी भूखंड लिहून घेण्याच्या घोटाळा प्रकरणात माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडीदेवी, त्यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव, तसेच त्यांची कन्या मीसा भारती यांच्या विरोधात दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयाने आरोप निश्चिती केली आहे. लालू प्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय यांची या प्रकरणात वर्तणूक गुन्हेगारी टोळीसारखी होती, असे आरोपपत्रात नोंद करण्यात आले असून आता त्यांच्यावर भ्रष्टाचार अभियोग चालविला जाणार आहे.
दिल्ली विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विशाल गोंगे यांनी आरोपनिश्चिती करण्याचा आदेश दिला आहे. लालू प्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या विरोधात संशय व्यक्त होण्यासारखे पुष्कळ पुरावे आहेत. हे प्रकरण गंभीर कारस्थानाचे असून अभियोग चालणे आवश्यक आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने जो पुरावा न्यायालयासमोर सादर केला आहे, तो लालू प्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या विरोधात अभियोग चालविण्यासाठी पुरेसा आहे, असे न्यायाधीश गोंगे यांनी त्यांच्या आरोपनिश्चितीच्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे.
सीबीआयकडून तपास
या घोटाळ्याचा तपास सीबीआयने केला आहे. सीबीआयनेच न्यायालयासमोर आरोपपत्र सादर केले होते. तसेच या आरोपपत्राला पुष्टी मिळेल असा पुरावाही सादर करण्यात आला आहे. हा पुरावा प्रथमदर्शनी ग्राह्या मानत न्यायाधीशांनी आरोप निश्चिती करण्याचा आदेश दिला. लालू प्रसाद यादव यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग संपत्ती मिळविण्यासाठी केला, असे आरोपपत्रात नमूद केले गेले आहे.
प्रकरण काय आहे...
2004 मध्ये केंद्रात काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आल्यानंतर त्या सरकारात लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात रेल्वेमध्ये नोकऱ्या देण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी युवकांकडून त्यांच्या मालकीचे भूखंड आपल्या नावे करुन त्याच्या मोबदल्यात त्यांना नोकऱ्या दिल्या, असा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. सीबीआयने तो पूर्ण करुन आरोपपत्र सादर केले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात अभियोग चालणार आहे. या प्रकरणात लालू यादव आणि त्यांचे कुटुंबीय सध्या जामिनावर बाहेर आहेत. लालू यादव यांना चारा घोटाळ्याच्या अनेक प्रकरणांमध्येही शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या प्रकरणांमधूनही ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. आता हा नवा अभियोग त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची अधिकच कोंडी करणे शक्य आहे.