दर्शनसह सर्व आरोपींवर दोषारोप निश्चित
रेणुकास्वामी खून प्रकरण : सर्व आरोपींकडून आरोपांचा इन्कार
बेंगळूर : चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी याचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी कन्नड सिनेअभिनेता दर्शन, त्याची प्रेयसी पवित्रा गौडा आणि इतर आरोपींविरुद्ध सोमवारी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. रेणुकास्वामी खून प्रकरणात बेंगळूरच्या 57 व्या सीसीएच न्यायालयात 17 आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. हत्या, फितुरी, अपहरणाचा कट, अपहरण आणि बेकायदेशीर बैठका असे निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, सर्वच आरोपींनी आपल्याविरुद्धच्या आरोपांचा इन्कार केला आहे. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी 10 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली.
दोषारोप निश्चित करण्यात येणार असल्याने बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहात असलेल्या 7 आरोपींना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. जामिनावर बाहेर असलेले आरोपीही न्यायालयात हजर झाले होते. अपहरण, खून, पुरावे नष्ट, बेकायदा बैठकांचे आयोजन, कारस्थान यासह अनेक आरोप दर्शनवर लादण्यात आले आहेत. न्यायाधीशांनी सर्व आरोपींसमोर दोषारोप वाचून दाखविले. मात्र, आरोपींनी आपल्याविरुद्धचे आरोप मान्य केले नाही. त्यामुळे न्यायाधीशांनी साक्षीदादारांचे जबाब नोंदविण्यासाठी पुढील तारीख निश्चित केली.
रेणुकास्वामी खून प्रकरणातील प्रमुख आरोपी पवित्रा गौडाला न्यायाधीशांनी काही प्रश्न विचारले. रेणुकास्वामीने आरोपी पवित्रा गौडाला अश्लील संदेश पाठविल्याचे सांगण्यात आले असून त्यानंतर त्याचे अपहरण करून बेंगळूरमधील शेडमध्ये आणण्यात आले. तेथेच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. आरोपींनी चप्पल आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला केला. यामुळे गंभीर जखमी झालेल्या रेणुकास्वामीचा मृत्यू झाला, असे न्यायाधीशांनी सांगितले. मात्र, सर्व आरोपींनी चूक कबूल करण्यास नकार दिला. त्यामुळे न्यायालयाने 10 नोव्हेंबर रोजी आरोप निश्चितीनंतरची पुढील प्रक्रिया हाती घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर दर्शन, पवित्रा गौडासह सात आरोपींना पुन्हा बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहात नेण्यात आले.