आमदार अखिल गोगोई विरोधात आरोप निश्चित
सीएए विरोधात निदर्शनांचे प्रकरण
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
एनआयएच्या विशेष न्यायालयाने नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमाच्या (सीएए) विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये भूमिका असल्याप्रकरणी आसाममधील आमदार अखिल गोगोई तसेच त्यांच्या तीन सहकाऱ्यांच्या विरोधात युएपीए आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांच्या अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत.
आम्ही लोकांसोबत असून हे सरकार आम्हाला तुरुंगात डांबू पाहत असल्याचे या आरोपपत्रातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. फॅसिस्टवादी आणि सांप्रदायिक सरकारच्या विरोधातील लढाई अत्यंत अवघड असल्याचे अखिल गोगोई यांनी आरोप निश्चित झाल्यावर म्हटले आहे.
सर्व चारही जणांच्या विरोधात आरोप निश्चित केल्याच्या विरोधात गुवाहाटी उच्च न्यायालयाकडे दाद मागणार आहोत असे गोगोई यांनी म्हटले आहे. डिसेंबर 2019 मध्ये राज्यात झालेल्या हिंसक निदर्शनांप्रकरणी गोगोई आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांच्या विरोधात एनआयए चौकशी करत आहे. गोगोई यांना डिसेंबर 2019 मध्ये अटक करण्यात आली होती, त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली होती. गोगोई यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे हिंसा भडकल्याचा आरोप आहे.