पुरावे असतील तरच करा आरोप!
भारताने कॅनडाला सुनावले खडे बोल : निज्जर हत्या प्रकरण
वृत्तसंस्था/ लाओस
दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्या प्रकरणावरून भारत सरकारने कॅनडाला खडे बोल सुनावले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो कुठल्याही पुराव्यांशिवाय दहशतवादी निज्जरच्या हत्येसाठी भारत सरकारला जबाबदार ठरवू शकत नसल्याचे भारताने म्हटले आहे. जस्टिन ट्रुडो हे कथित दोषींना पकडण्यासाठी स्वत:च्या तपास यंत्रणांना राजकीय निर्देश देऊ शकत नसल्याने भारताकडून सुनावण्यात आले. भारताच्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात कॅनडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेतली होती. तपास यंत्रणा आरसीएमपीचे आरोप चुकीचे असल्याचे भारत सरकारने या भेटीदरम्यान स्पष्ट केले आहे. दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्या प्रकरणी आरसीएमपी तपास करत आहे.
जस्टिन ट्रुडो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 11 ऑक्टोबर रोजी आसियान शिखर परिषदेदरम्यान भेट झाल्याचा दावा काही प्रसारमाध्यमांनी केला होता. पंतप्रधान मोदी हे लाउंजकडून भोजनस्थळी जात असताना ट्रुडो यांनी त्यांच्याशी याप्रकरणी चर्चा केली होती. तर या मुद्द्यावर बोलण्यासाठी ही योग्य वेळ नसल्याचे पंतप्रधान मोदींनी त्यांना ऐकविले होते. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलनही केले नसल्याचा दावा करण्यात आला. कॅनडात पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अशास्थितीत ट्रुडो हे स्वत:च्या खलिस्तानी मतपेढीच्या राजकारणासाठी भारताला लक्ष्य करत आहेत. दोन्ही नेत्यांदरम्यान कुठलीच ठोस चर्चा झाली नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
लपविण्यासारखे काहीच नाही
भारताकडे निज्जर हत्याप्रकरणी लपविण्यासारखे काहीच नाही. ट्रुडो सरकारने भारताला बदनाम करण्यामागील कारणे स्पष्ट करावीत असे वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी कॅनडाकडे केली आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नथाली जी ड्रौइन आणि उपविदेशमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी भाग घेतला होता.