मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रेला ब्रेक
सद्यस्थितीत एका दिवसासाठी स्थगित : भाविकांना थांबविण्याचे प्रशासनाकडून निर्देश
वृत्तसंस्था/ देहराडून
उत्तराखंडमधील बिघडणारे हवामान लक्षात घेऊन प्रशासनाने चारधाम यात्रेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत चारधाम यात्रा 24 तासांसाठी थांबविण्यात आली आहे. जोरदार पावसानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. गढवालचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी रविवारी ही माहिती दिली आहे. दरम्यान, हवामान खात्यानेही मुसळधार पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वेगवेगळ्या जिह्यांतील डोंगराळ भागात पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी भूस्खलनामुळे रस्त्यांवर माती-दगड कोसळत असल्यामुळे मार्गात अडथळे निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत महामार्ग बंद करण्यात आले आहेत. चारधाम यात्रामार्गावर हजारो भाविक अडकले आहेत.
भाविकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय
चारधाम यात्रेकरूंना चमोली येथे सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आले आहे. बहुतांश भाविकांना बद्रीनाथ, पांडुकेश्वर, चमोली, जोशीमठ, कर्णप्रयाग येथे थांबवण्यात आले आहे. काही यात्रेकरूंना पिपलकोटी येथेही थांबवण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे प्रवास थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रेकरूंना जोशीमठाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
प्रशासन, पोलिसांकडूनही सूचना
दरडी कोसळल्यामुळे प्रवासी व भाविक विविध ठिकाणी अडकत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सर्वेश पनवार यांनी दिली आहे. दरम्यान, देहराडूनमधील हवामान केंद्राने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 24 तासांसाठी चारधाम यात्रा थांबवल्यामुळे भाविकांना हरिद्वार, ऋषिकेश, श्रीनगर, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग आणि विकासनगर येथे थांबवण्याच्या सूचना पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
गंगा नदीचे पाणी धोका पातळीकडे
उत्तराखंडमधील पर्वतीय भागांमध्ये सतत पाऊस पडत असल्याने गंगेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. ऋषिकेशमध्ये गंगा धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत आहे. पुरामुळे वाढलेले पाणी प्रमुख घाटांपर्यंत पोहोचले आहे. प्रमुख घाटांचे प्लॅटफॉर्म पाण्याखाली बुडू लागल्यामुळे मैदानी भागात गंगेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे त्रास वाढू शकतो. त्याचवेळी, शनिवारी रात्री उशिरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रुद्रप्रयाग जिह्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.
पावसामुळे रस्ता वाहून गेला
बांगरपट्टीच्या मुख्य मायाली-रंधर महामार्गावरील पोंथी आणि मुन्याघर दरम्यान असलेला मोटर पूल वाहून गेला आहे. संपूर्ण बांगरपट्टीची वाहतूक थांबली आहे. याशिवाय, परिसरातील जाखवाडी तल्ली थापला येथेही नुकसान झाले आहे. त्याचवेळी, तहसील मुख्यालय बासुकेदारच्या क्यार्क बारसुडीजवळ वीज पडल्याने गुप्तकाशी जाखोली मोटर रस्त्याचा सुमारे वीस मीटर भाग वाहून गेला आहे. दुसरीकडे, जाखोली ब्लॉकमधील कंडाली गावात शेतात मोठे दगड पडल्यामुळे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.