‘चारधाम’ यात्रेला पुन्हा प्रारंभ
वृत्तसंस्था / देहराडून
प्रतिकूल हवामान आणि दरडी कोसळल्याच्या घटना यामुळे काही काळासाठी थांबविण्यात आलेली ‘चारधाम’ यात्रा आता पुन्हा मार्गस्थ करण्यात आली आहे. या यात्रेत 24 तास खंड पडला होता. परिस्थितीमुळे उत्तराखंड प्रशासनाने या यात्रेच्या पुढच्या प्रवासावर 24 तासांची बंदी रविवारी घोषित केली होती. आता ही बंदी उठविण्यात आली असून यात्रेला पुढे जाण्यास अनुमती देण्यात आली आहे.
रविवारी उत्तराखंडमध्ये प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली होती. यात्रेच्या मार्गात बारकोट येथे ढगफुटी झाल्याने पुढचा मार्ग बंद झाला होता. मोठ्या पावसामुळे यात्रा मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. तथापि, आता परिस्थितीत मोठी सुधारणा झाली आहे. तसेच ढिगारे दूर करुन मार्ग मोकळा करण्यात आला आहे. परिणामी यात्रा मार्गस्थ करण्यासाठी योग्य वातावरण निर्माण झाले आहे.
मार्ग गेला वाहून
बारकोट येथे प्रचंड वृष्टीमुळे यात्रा मार्ग काही स्थानी वाहून गेला होता. तो त्वरित ठीकठाक करण्यात आला. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या आपदा निवारण दलांनी त्वरित मार्ग मोकळा करण्याच्या कामाला प्रारंभ केल्याने यात्रेला अधिक काळ खोळंबून रहावे लागले नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी
गेले तीन दिवस उत्तराखंड राज्याच्या सर्व भागांमध्ये अतिवृष्टी होत आहे. किमान 50 खेड्यांचा मुख्य भूमीशी संपर्क तुटला आहे. अनेक स्थानी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्याने अनेक मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. याचा परिणाम पर्यटनावरही झालेला आहे. राज्य प्रशासनाने अतिवृष्टीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्याची व्यवस्था गतीमान केली आहे.