चरावणेतील श्री सातेरी केळबाय देवस्थानच्या विकासासाठी साडेतीन कोटींचा निधी : आमदार डॉ. देविया राणे
वाळपई : पर्ये मतदारसंघातील धार्मिक व सांस्कृतिक स्थळांच्या विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील चरावणे येथील श्री सातेरी केळबाय देवस्थानाच्या विकासासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी दिली.
डॉ. राणे यांनी नुकतीच चरावणे गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी विविध विकासकामांबाबत चर्चा केली. स्थानिक पंचायत सदस्य विनायक यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या, सूचना आणि विकासाच्या अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी गावातील धार्मिक स्थळे, मूलभूत सुविधा, सामाजिक उपक्रम तसेच भविष्यातील विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थांनी चरावणे येथील श्री सातेरी केळबाय देवस्थानाच्या विकासाची मागणी डॉ. राणे यांच्यासमोर मांडली. देवस्थान हे गावातील प्रमुख धार्मिक व सामाजिक केंद्र असून, वर्षभर येथे विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले जातात. त्यामुळे देवस्थान परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत डॉ. राणे यांनी देवस्थानाच्या विकासासाठी आवश्यक सुविधांबाबत माहिती जाणून घेतली. देवस्थान परिसर अधिक सुटसुटीत, सुरक्षित आणि भाविकांसाठी सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देवस्थानाच्या विकासकामांमध्ये परिसर सुशोभीकरण, विद्युत सुविधांची उभारणी व सुधारणा, देवस्थान मंडपाचे सुशोभीकरण तसेच धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी भाविक आणि ग्रामस्थांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे. परिसरात पायवाटा, पेव्हर्स आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही ग्रामस्थांनी केल्या.
दरम्यान, चरावणे येथील शंकरनाथ महाराज संप्रदायाच्या मठाच्या दुरुस्तीचा मुद्दाही ग्रामस्थांनी मांडला. या मठाचे आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मठाच्या दुरुस्ती व आवश्यक सुधारणांसाठी सुमारे साडेतीन लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे डॉ. राणे यांनी स्पष्ट केले.