दापोलीत 4 लाखांचा चरस जप्त
दापोली :
तालुक्यातील केळशी किनारा मोहल्ला येथे पोलिसांनी छापा टाकून 0.998 किलो ग्रॅम वजनाचा 4 लाखाचा चरस जप्त करण्यात आला. या कारवाईत अब्रार इस्माईल डायली (32, रा. केळशी किनारा मोहल्ला, दापोली) याला अटक करण्यात आली आहे. त्याने आपल्या राहत्या घराच्याच मागील बाजूस चरस लपवला होता. दापोली पोलिसांच्या या अमली पदार्थविरोधी कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे. आरोपीच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल उदय टेमकर यांनी दिली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या छाप्यात अब्रार इस्माईल डायली याने आपल्या राहत्या घराच्या मागील बाजूस अवैधरित्या ठेवलेला 0.998 किलो ग्रॅम वजनाचा उग्र वास असलेला चरस सापडला. पोलिसांनी जप्त केलेला माल अंदाजे 4 लाख रुपयांचा आहे. ही कारवाई स्थानिक पातळीवर मोठी मानली जात आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव, निर्मल, महेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू मोहिते, रुपाली ढोले, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय देवकुळे, प्रदीप भांडे, उदय टेमकर, रुपेश दिंडे, कर्देकर, महिला पोलीस कविता पाटेकर आदी सहभागी झाले होते. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे. शिवाय या घटनेतील डायली याच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारच्या अमली पदार्थांच्या व्यापाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.