‘चराईदेव मोईदम’ जागतिक वारसास्थळ
आसामच्या ‘अहोम’ची दफनभूमी
‘आसामचा पिरॅमिड’ अशी ओळख
आसाम हे ईशान्येकडील सात राज्यांपैकी सर्वात मोठे आहे. चहा, कॉफीसाठी या राज्याची विशेष ओळख आहे. तसेच काझिरंगा आणि मानस नॅशनल पार्कमुळे येथील पर्यटन बहले आहे. मात्र, प्रचंड पाऊस कोसळत असल्याने आसामच्या भाळी पुराचा शाप आहे. तरीदेखील पर्यटनाचा येथील अर्थव्यवस्थेला आधार आहे. आता आसाममधील राजघराण्यांच्या दफनभूमीचा ‘चराईदेव मोईदम’चा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. जागतिक वारसा समितीने चराईदेव मोईदमचा भारताच्या 43 व्या जागतिक वारसास्थळाच्या स्वरुपात समावेश करण्याचा निर्णय घेतल्याने आसामने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.
आसामच्या ब्रह्मपुत्रा खोऱ्यात 1228 साली स्थापन झालेल्या अहोम राज्याने 600 वर्षे आपली सत्ता कायम ठेवली. चराईदेव येथे अहोम राज्यातील राजे, राजपुत्र, राजकन्या व त्यांचे नातेवाईक यांचे अवशेष भूमिगत चेंबरमध्ये दफन केले आहेत. त्यावर एक स्मारक बांधण्यात आले आहे. याचीच ओळख चराईदेव मोईदम अशी आहे. याला ‘आसामचा पिरॅमिड’ असेही म्हटले जाते.
भारतात प्रथमच जागतिक वारसा समितीची बैठक आयोजित केली होती. वारसा समितीच्या बैठकीत 165 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तीन वर्षांपूर्वी आसामच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीसाठी चराईदेव मोईदमची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतरच जागतिक वारसास्थळांच्या यादीत मोईदमचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील 43 पैकी 13 स्थळांना मागील 10 वर्षांमध्ये जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
चराईदेव मोईदम अहोम समूदायात पवित्र मानले जातात. अहोम राज्यकर्ते अथवा त्यांच्या परिवारातील सदस्यांचे पवित्र दफनस्थळ म्हणून माईदमची ओळख आहे. येथे त्यांच्या अवशेषांबरोबच मौल्यवान कलाकृती आणि खजिना संरक्षित ठेवला जातो. मृत अवशेषांना एका भूमिगत कक्षात दफन केले जातात. त्यावर टेकडी किंवा स्मारकाची निर्मिती केली जाते. चराईदव परिसरात 90 हून अधिक टेकड्यासदृश मोईदम आहेत. या टेकड्या म्हणजे आसामचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. शिवसागर शहरापासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर वसलेले मोईदम ‘आसामचे पिरॅमिड’ म्हणूनही प्रसिद्ध आहेत. चराईदेव ही अहोम राज्याची राजधानी होती. अहोम राजघराण्याचे आसाममध्ये सुमारे 600 वर्षांपर्यंत राज्य होते.
13व्या ते 19व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत अहोमांनी आसामवर राज्य केले. त्यांच्या प्रदीर्घ राजवटीने राजकीय आणि सांस्कृतिक ऐक्य प्रस्थापित केले आणि या प्रदेशाला आर्थिक स्थैर्य दिले. प्रदेशातील विविध वांशिक गटांना एका प्रशासनाखाली एकत्र आणल्याने राष्ट्रीयत्व आणि संस्कृतीच्या उक्रांती होऊ शकली. ते नंतर आसामी म्हणून ओळखले गेले.
पारंपारिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अहोम लोक ग्रेट ताई (ताई-याई) लोकांच्या समूहाचे सदस्य आहेत. 1215 (ख्रिस्तपूर्व) मध्ये अहोम लोक मोंग-माओ किंवा मोंग-माओ-लुंग (चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ दक्षिण-पश्चिम युनान प्रांतातील सध्याचे देहोंग दाई जिंगफो स्वायत्त प्रांत) येथून स्थलांतरित झाले. त्यांनी चाऊ-लुंग सिउ-का-फा नावाच्या माओ-शांग राजपुत्राच्या नेतृत्वाखाली पटकाई टेकड्यांमधून ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील वरच्या आसाम प्रदेशात प्रवेश केला. तो अहोम वंशाचा पहिला राजा किंवा चाओ-फा किंवा स्वर्गदेव (स्वर्गाचा देव) बनला, ज्याने चे-राय-दोई किंवा चराईदेव येथे पहिली अहोम राजधानी स्थापन केली.
17 व्या शतकाच्या अखेरीस अहोम राजांनी त्यांच्या प्रदीर्घ 600 वर्षांच्या सत्तेत
ब्रह्मपुत्रा खोऱ्याच्या लांबी आणि ऊंदीवर राज्याचा विस्तार केला होता. चाऊ-लुंग सिउ-का-फा चे उत्तराधिकारी जसे सुहंगमुंग (1497-1539), सुक्लेंगमुंग
(1539-1552), प्रताप सिंघा (1603-1641), गदाधर सिंघा (1681-1696), ऊद्र सिंघा (1696-1714), शिव सिंघा (1714-1744), प्रमत्ता सिंघा
(1744-1751), राजेश्वर सिंह (1751-1769) यांनी ब्रह्मपुत्रा खोऱ्यात बलाढ्या मुघल आणि प्रांतीय शासकांसह इस्लामिक शासकांपासून बचाव करून एक मजबूत राज्य निर्माण केले.
अहोमनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक धर्मनिरपेक्ष आणि धार्मिक स्थापत्य उपक्रम हाती घेतले. त्यापैकी एक उपक्रम म्हणजे मोईदम (दफनातील ढिगारा) वास्तुकला.
या वास्तुकलेने जागतिक समुदायाचे लक्ष वेधून घेतले. देशाच्या इतर भागात सापडलेल्या अन्य कोणत्याही अंत्यसंस्कार संरचनांपेक्षा याची रचना वेगळी आहे. शैली आणि स्थापत्यशास्त्र अप्रतिम आहे.
अशी आहे रचना
मोईदमचा बाहेरचा भाग गोलार्ध आहे. त्यांचा आकार सामान्य ढिगाऱ्यापासून 20 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या टेकडीपर्यंत असतो. दफन केलेल्या व्यक्तीच्या शक्ती, स्थितीवर आकार अवलंबून असतो. मोईदमचे वैशिष्ट्या म्हणजे चेंबरची तिजोरी, एक अर्धगोलाकार मातीचा ढिगारा ज्यावर विटांनी चेंबरला झाकलेले असते आणि टेकडीच्या पायथ्याभोवती एक अष्टकोनी भिंत असते. त्यावर कमानदार प्रवेशद्वार असते.
खजिन्याची लूट
आधीच्या काळात तेथील तिजोरी लाकडी खांब आणि तुळयांपासून बनलेली असे. राजा ऊद्र सिंह (1696-1714) आणि त्याच्या उत्तराधिकाऱ्यांच्या काळापासून तिजोरी दगड आणि विटांनी बनवल्या गेल्या. अहोम राजांना त्यांच्या खजिन्यासह त्यांच्या दैनंदिन वापरातील कपडे, दागिने, शस्त्रs इत्यादीसह दफन केले जायचे. अहोम इतिहासानुसार मोठ्या प्रमाणात मौल्यवान वस्तू आणि जिवंत किंवा मृत सेवक राजघराण्यांसोबत पुरले गेले. मात्र, जिवंत दफन करण्याच्या प्रथेवर राजा ऊद्र सिंह (1696-1714) यांनी बंदी घातली होती. मोईदममधील खजिन्याने मुघलांपासून इंग्रजांपर्यंत अनेक लुटारूंना आकर्षित केले आणि मोईदम्स अनेकदा लुटण्यात आले.
केवळ घ्राफलिया आणि लिखुराखान खेलमधील लोकांना (खेल हा लोकांचा समूह आहे ज्यांना विशिष्ट कामासाठी नियुक्त केले गेले होते आणि प्रत्येक खेलामध्ये एक ते पाच हजार लोकांचा समावेश होता) दफन विधी करण्याची परवानगी होती. अहोम राजांनी रॉयल मोईदमसह सर्व नागरी कामांच्या बांधकाम आणि देखभालीसाठी विशेष अधिकारी म्हणून चांगऊग फुकन यांची नियुक्ती केली. चांगऊंग फुकन हा सर्वोच्च दर्जाच्या नऊ फुकनांपैकी एक होता.
मोईदमच्या ग्राऊंड प्लॅनचे सर्वात जुने स्केच एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या जर्नलमध्ये जून 1848 मध्ये प्रकाशित झाले होते. जे सार्जंट सी. क्लेटन यांनी काढले होते, जे 1840 मध्ये मोईदमचे अधीक्षक आणि उत्खनन करत होते. त्यानंतर आसामचे मुख्य सहाय्यक आयुक्त. क्लेटन आणि त्यांच्या टीमला अंगठ्या, चांदीची टूथपिक केस, कानातले दागिने, गोबलेट्स, प्लेट्स आणि सोन्याचा चुना असा एक छोटा डबा सापडला. अभिलेखीय अहवालात असे दिसून आले आहे की 1905 मध्ये, अनेक अहोम राजकुमारींच्या देखरेखीखाली, एक मोईदम उत्खनन करण्यात आला होता.
उत्खननात आढळल्या मौल्यवान वस्तू
आर्कालॉजिकल सर्व्हे गुवाहाटी यांच्याद्वारा 2000-02 मध्ये मोईदम क्रमांक 2 चे उत्खनन करण्यात आले. त्याखाली अनेक कलाकृती सापडल्या. त्यापैकी, सर्वात लक्षणीय हस्तिदंत सजावटीचे तुकडे आणि वृक्षाच्छादित वस्तुंचे तुकडे होते. एक हस्तिदंती अॅपनल एक पौराणिक ड्रॅगन स्वरुपात होते. लहान हस्तिदंत सजावटीच्या कला वस्तू, गोल आकाराची हस्तिदंती बटणे, सोन्याचे पेंडेंट आणि काही शिशाचे तोफगोळे आढळले. हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर अहोमांनीही त्यांच्या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास सुऊवात केली.
मोईदमची वैशिष्ट्यो
अहोम बुरंजी (इतिहास) मध्ये असा उल्लेख आहे की एक शवपेटी उरियाम (बेस्कोफिया जावानिका) नावाच्या लाकडापासून बनलेली होती. शवपेटी ऊंग-डांग म्हणून ओळखली जात असे. केकोरा डोला येथील स्मशानभूमीत शवपेटी फक्त
घ्राफलिया आणि लिखुराखान खेळातील लोक घेऊन जात होते. अर्धगोलाकार इर्टन माऊंडच्या खाली असलेल्या भव्य तिजोरीला कारेंग-ऊंग-डांग (शवपेटी) असे म्हणतात. मृतदेह ठेवल्यानंतर त्यांनी तिजोरीचे दार मातीच्या मोर्टारने बंद केले. चराईदेव येथे मृतदेह वाहून नेण्यासाठी एक विशिष्ट रस्ता होता ज्याला सा-निया-अली (सा म्हणजे मृतदेह, निया म्हणजे वाहून नेणे आणि अली म्हणजे पथ किंवा रस्ता) म्हटले जाई. मृत शरीराच्या धार्मिक स्नानासाठी एक विशिष्ट टाकी होती ती सा-धुआ-पुखुरी (सा म्हणजे मृत शरीर, दुआ म्हणजे आंघोळ आणि पुखुरी म्हणजे टाकी) म्हणून ओळखली जात असे.
पवित्र स्थान
मोईदम हे अहोम राजे-राणी आणि परिवाराच्या दफनभूमी आहेत. मोईदम हा शब्द फ्रांग-माई-डॅम किंवा माई-ताम या ताई शब्दापासून आला आहे. फ्रांग-माई म्हणजे थडग्यात टाकणे किंवा दफन करणे आणि डॅम म्हणजे मृतांचा आत्मा.
मोईदम वरच्या आसामच्या सर्व जिह्यांमध्ये आढळतात. चराईदेव अहोमची पहिली राजधानी जवळजवळ सर्व अहोम राजघराण्यांचे दफनस्थळ होती. अहोमचा पहिला राजा चौ-लुंग सिउ-का-फा याला त्याच्या मृत्यूनंतर सर्व ताई-अहोम धार्मिक विधी आणि विधींचे पालन करून चराईदेव येथे दफन करण्यात आले. तेव्हापासून, ताई-अहोम राजे, राणी आणि राजकुमार, राजकन्या यांना चराईदेव येथे दफन केले जाते. त्यांच्या सहाशे वर्षांच्या कारकिर्दीत हे पवित्र स्थान बनले.
राज्याचा सन्मान
चराईदेव मोईदम आता अधिकृत स्वरुपात युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ ठरल्याने राज्याचा सन्मान झाला आहे. हा निर्णय केवळ आसाम नव्हे, तर पूर्ण देशासाठी गौरवास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यामागे अथक परिश्रम आहेत. त्यांचे आम्ही ऋणी आहोत.
-डॉ. हिमांता बिस्वा शर्मा, मुख्यमंत्री, आसाम
- संकलन - राजेश मोंडकर, सावंतवाडी