त्रिगुणांची वैशिष्ट्यो
अध्याय नववा
आपण सत्व, रज आणि तम गुणांचा तौलनिक अभ्यास करत आहोत. रज आणि तम गुणांची वैशिष्ट्यो सांगणारा लोभोऽ शमऽ स्पृहारम्भऽ कर्मणां रजसो गुणऽ । मोहोऽ प्रवृत्तिश्चाज्ञानं प्रमादस्तमसो गुणऽ ।। 32 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार लोभ, अशांती, इच्छा आणि कर्माला सुरवात करण्याची घाई असते तेव्हा रजोगुण प्रभावी असतो, तर मोह, अप्रवृत्ति, अज्ञान आणि प्रमाद असतात तेंव्हा तमोगुण अधिक असतो.
सत्वगुणी मनुष्य ज्ञान आणि मन:शांती मिळवत असतो आणि त्याचा उपयोग त्याने ईश्वरप्राप्तीसाठी करावा अशी अपेक्षा असते. मात्र काही वेळा त्याला स्वत:च्या ज्ञानाचा आणि मन:शांतीमुळे मिळणाऱ्या सुखाचा अहंकार होऊन तो ईश्वरापासून दूर जातो. रजोगुणी मनुष्य कसल्या ना कसल्या अपेक्षेने सतत काम करत असतो. त्यामुळे ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणे त्याच्या स्वभावातच नसते. कामनांच्या अधीन झालेला मनुष्य मन ताब्यात नसल्याने कळून सवरून, दु:खदायक अशी कामे करतो. त्यामुळे त्याचे दु:ख उत्तरोत्तर वाढतच जाते. यातून सुटका होण्यासाठी साधकाने लक्षात घ्यावे की, पदार्थ, व्यक्ती, परिस्थिती इत्यादि गोष्टींचे महत्त्व तेव्हढ्यापुरतेच असते. म्हणून त्यासंबंधात आवश्यक ते कर्म करून निरपेक्षतेनं बाजूला व्हावे म्हणजे सात्विक वृत्ती वाढेल आणि आसक्तीतून म्हणजे व्यक्ती, वस्तू व परिस्थितीत मनाच्या गुंतवणुकीतून सुटका होईल.
आता तमोगुणी माणसाची तऱ्हा कशी असते ते पाहू. स्वत:च्या व स्त्राrपुत्रदिकांच्या सुखासाठी देह झिजवणे हे तमोगुणी माणसाचे ध्येय असते. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्याची तयारी असते. पुण्याने स्वर्ग मिळतो आणि पापाने नरकाची प्राप्ती होते हे त्याला माहित असते पण त्याच्या तमोगुणी स्वभावामुळे तो तिकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. स्वार्थासाठी उन्मत्त होऊन मी करतोय तेच बरोबर आहे अशी त्याची ठाम समजूत असते. अहंकारी स्वभावामुळे वेद, शास्त्रानाही तो तुच्छ समजतो. तमोगुण प्रमाद, आळस आणि झोप यामुळे वाढीस लागतो. पुढील श्लोकात बाप्पा या त्रिगुणांविषयी अधिक माहिती देत आहेत.
सत्त्वाधिकऽ सुखं ज्ञानं कर्मसंगं रजोऽधिकऽ ।
तमोऽधिकश्च लभते निद्रालस्यं सुखेतरत् ।। 33।।
अर्थ-सत्त्वगुण अधिक असलेल्या मनुष्याला सुख व ज्ञान मिळते. रजोगुण अधिक असलेल्या मनुष्याला कर्माच्या फळाची ओढ लागते. तमोगुण अधिक असलेल्या मनुष्याला निद्रा, आळस प्रिय असल्याने त्याला दु:ख मिळते.
विवरण-कोणत्याही व्यक्तीत सत्व, रज, तम यापैकी एकच गुण वास करत असतो असे कधीच घडत नाही. माणसाचा स्वभाव हा मायेपासून तयार झालेला असल्याने तो त्रिगुणात्मक असतो. ज्या गुणाचे आधिक्य असते त्या प्रमाणे त्याला सात्विक, राजसी अथवा तामसी स्वभावाचा आहे असे म्हंटले जाते. माणसाने प्रत्येक गुणाचे सामर्थ्य लक्षात घेऊन निरनिराळ्या प्रसंगातील स्वत:च्या वर्तणुकीवर लक्ष ठेवले पाहिजे. आपले केव्हा व कुठे चुकले यावर चिंतन करत राहून पुन्हा तशा प्रकारच्या प्रसंगात सावध राहिले पाहिजे. उदाहरणार्थ, रस्त्यावर पडलेली शंभर रुपयांची नोट उचलून घ्यायची का नाही हे ठरवताना जी वस्तू आपली नाही ती घ्यायची नाही असे वाटले की, सत्वगुणाचा प्रभाव जाणवतो, मी घेतली नाही तर इतर कुणीतरी घेणारच मग मी घेतली तर कुठे बिघडले असं वाटलं की, रजोगुणाचा प्रभाव जाणवतो, ती नोट बिनदिक्कत उचलून घेऊन व्यसनात खर्च करणारा तमोगुणाच्या प्रभावाखाली असतो. सत्वगुणामुळे ज्ञान व शांती मिळते, माणसाला अतृप्त ठेवणारा रजोगुण सगळ्यात जास्त हानिकारक असतो तर तमोगुण माणसाला झोप, आळस आणि व्यसनात गुंतवून टाकतो.
क्रमश: