सत्व, रज आणि तमोगुणांची वैशिष्ट्यो
अध्याय नववा
पंचमहाभूतांपासून तयार झालेला देह हा त्रिगुणांनी युक्त असतो. ईश्वरप्राप्तीसाठी माणसाने सत्वगुणाची वाढ करावी म्हणजे तो विकाररहीत होतो. त्याच्या स्वभावामध्ये सद्भाव, विचारांमध्ये निर्मलता आणि वागण्यामध्ये चांगुलपणा येतो, त्याची बुद्धी जास्त कार्यक्षम असते. या सगळ्या सकारात्मक गोष्टींचा उपयोग करून त्याने ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करावेत, अशी बाप्पांची अपेक्षा आहे पण ज्याप्रमाणे पोपटाला आपला पिंजराच छान वाटू लागतो आणि पिंजऱ्याचे दार उघडे असले तरी आकाशात उडून जाण्याचा विचारसुद्धा त्याच्या मनात येत नाही त्याप्रमाणे सत्वगुण वाढवण्याच्या प्रयत्नात असलेला मनुष्य शास्त्राभ्यास करून पंडित होतो. त्याला आपण इतरांच्यापेक्षा ज्ञानी आहोत, सुखी आहोत याचा अहंकार वाटू लागून तो त्यातच आनंद मानू लागतो. त्यामुळे अहंकाराच्या पिंजऱ्यातच तो स्वत:हून कैद होतो आणि त्याचा पुढील आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग खुंटतो. त्याला माहिती पुष्कळ असते. त्याचा उपयोग करून ईश्वरप्राप्ती कशी करून घेता येईल हेही त्याला माहित असतं पण प्रत्यक्षात त्याचा तो स्वत:साठी उपयोग करून घेत नसल्याने त्याची प्रगती खुंटते. हा धोका लक्षात घेऊन सावध राहण्यासाठी श्रीकृष्ण भगवदगीतेच्या चौदाव्या अध्यायात सांगतात, की, सत्वगुण निर्मळ असल्याने ज्ञान आरोग्य वाढवतो ही गोष्ट खरी पण त्याचबरोबर सत्वगुणी मनुष्य मी सुखी आणि मी ज्ञानी अशा बेडीत अडकण्याची शक्यता असते. विशेष गंमत म्हणजे तो जे शास्त्रानुसार बोलत असतो, सांगत असतो त्याप्रमाणे वर्तन करून एखादा अडाणी मनुष्य स्वत:चा उद्धार करून घेतो परंतु हा मात्र त्याच्या अहंकारात चूर होऊन स्वत:च्याच मस्तीत जगत असतो. हे लक्षात घेऊन तुकाराम महाराज त्यांच्या अभंगात म्हणतात, जो जसं बोलतो त्याप्रमाणे वागत असेल, त्याला देव मानून त्याचा मी दास होऊन राहीन. त्याचे अंगण झाडीन, त्याचा किंकर वाहयला मला यत्किंचितही कमीपणा वाटणार नाही. बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाउले? अंगे झाडीन अंगण । त्याचे दास्यत्व करीन? त्याचा होईन किंकर । उभा ठाकेन जोडोनि कर? तुका म्हणे देव । त्याचे चरणी माझा भाव? परंतु हे सर्व लक्षात न घेता अहंकारी सत्वगुणी मनुष्य आपलं नुकसान करून घेत असतो. त्यामुळे तो मुक्कामी न पोहोचता पुन:पुन्हा आहे तिथंच घुटमळत राहतो. म्हणून जो दया, क्षमा शांती ह्यांची स्वभावात वाढ होण्यासाठी सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने त्या सत्वगुणाचा आपल्याला अहंकार होत नाही ना, ह्याची सदैव चाचपणी करावी आणि वेळीच सावध व्हावे. अखंड सावध राहणे ही एक साधनाच असते. सत्वगुणाचे फायदे व तोटे बघितल्यानंतर पुढील श्लोकात रज आणि तम गुणांबद्दल बाप्पा काय सांगतायत ते पाहू.
लोभोऽ शमऽ स्पृहारम्भऽ कर्मणां रजसो गुणऽ ।
मोहोऽ प्रवृत्तिश्चाज्ञानं प्रमादस्तमसो गुणऽ ।। 32 ।।
अर्थ- लोभ, चित्त शान्त नसणे, इच्छा आणि कर्मारंभाची उत्सुकता असते तेव्हा रजोगुण अधिक असतो तर मोह, अप्रवृत्ति, अज्ञान आणि प्रमाद असतात तेंव्हा तमोगुण अधिक असतो.
विवरण- रजोगुण हा तिन्ही गुणात प्रभावी असतो कारण तो सर्व वासनांचे आणि उपभोगांच्या आसक्तीचे सार आहे. वासनांच्या आणि उपभोगांच्या आवडीमुळेच जगातील सर्व घडामोडी चालू आहेत. सर्व काम्य म्हणजे अपेक्षा ठेऊन करण्याच्या कर्माचे बीजच रजोगुणात साठवलेले आहे. काम आणि क्रोध हे षडविकारातले प्रमुख विकार हे या रजोगुणाचेच प्रताप आहेत. संसारामध्ये सारखे आणखीन हवे असे वाटणे, कितीही विषयोपभोग मिळाले तरी तृप्ती न होणे, सदोदित अशांती व काळजीत मग्न राहणे, इच्छा, आकांक्षा, हव्यास वाढतच जाणे हा रजोगुणी स्वभाव होय.
क्रमश: