निरोगी समाजाची लक्षणे..
डीजेचा दणदणाट हा केवळ एका शहरापुरता किंवा राज्यापुरता सीमित प्रश्न राहिलेला नाही. परंतु, मागच्या अनेक वर्षांपासून ही कर्कशता लोक मुकाट्याने सहन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील विद्यानंद बापट या रहिवाशाने डीजेविरोधात घेतलेली भूमिका आणि त्याला सर्वसामान्य नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद, हे निरोगी समाजाचेच लक्षण म्हणता येईल.
भारतीय समाज हा उत्सवी आहे. मुळात उत्सवप्रिय असण्यात काहीही गैर नाही. किंबहुना, या उत्सवाला उच्छादाचे स्वरूप येत असेल, तर त्याचा मूळ उद्देशच हरवतो. सध्या सण, उत्सव तसेच महापुरुषांच्या जयंत्या वा अन्य कार्यक्रमांची अवस्था अशीच झाली आहे. डीजेचा कानठळ्या बसवणारा दणदणाट, त्यावर मद्यधुंद अवस्थेत थिरकरणारी मंडळी हे चित्र जिथेतिथे सर्रास पहायला मिळते. यातून ध्वनिप्रदूषणाबरोबरच वाहतूक कोंडीसारख्या प्रश्नांना नागरिकांना सामोरे जावे लागते. लहान मुले, रुग्ण, वृद्धांना वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्यांशी सामना करावा लागतो. परंतु, धार्मिक स्वातंत्र्य वा उत्सवाच्या नावाखाली सगळ्या गोष्टी खपून जातात. त्यामुळे वर्षानुवर्षे हा सगळा धांगडधिंगा लोक मुकाट्याने सोसत आहेत. मात्र, या सगळ्याला पुण्यातील एका सर्वसामान्य नागरिकाने वाचा फोडल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसते. पुण्यात मध्यंतरी गणेश मंडळे, महापालिका व पोलीस प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पुण्यातील नारायण पेठेतील रहिवासी असणाऱ्या विद्यानंद बापट यांनी डीजेविरोधी भूमिका मांडली. वास्तविक, अशा संयुक्त बैठकीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. बापट यांनी अतिशय मुद्देसूदपणे विचार मांडत आपला हा अधिकार बजावला. मात्र, मंडळाची मंडळी आक्रमक झाल्याने बैठकीतून बापट यांना बाहेर काढण्यात आले. तथापि, सर्वसामान्य पुणेकरांनी व माध्यमांनी बापट यांची तर्कशुद्ध मांडणी व भूमिका उचलून धरल्याने डीजेविरोधी विचार दाबण्याचा उत्सववाद्यांचा प्रयत्न फसल्याचे दिसून येते. वास्तविक, पुण्यासारख्या शहराला मोठा ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक वारसा लाभला आहे. हा वारसा निश्चितपणे काही गणेशोत्सव मंडळे पुढे नेताना दिसतात. ही मंडळे नक्कीच कौतुकास पात्र आहेत. किंबहुना, काही मंडळांचे नेते वा कार्यकर्ते उत्सव दणक्यातच झाला पाहिजे आणि डीजे वाजलाच पाहिजे, अशी भूमिका घेत असतील, तर ती कालसुसंगत म्हणता येत नाही. उत्सवातील कर्कशतेचे समर्थन करण्याच्या नादात भाजपाच्या शहराध्यक्षांनी ‘बापटांना कुत्रेही ओळखत नाही,’ अशी वापरलेली भाषा राजकारण्यांच्या घसरत्या दर्जाचे गमक होय. अर्थात या महाशयांचे राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच अप्रत्यक्ष कान टोचले, हे बरे झाले. डीजे, लेझरचा वापर टाळून उत्सवाचे मांगल्य टिकविण्याचे त्यांनी केलेले आवाहन मंडळांच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. खरे तर गणराय हे बुद्धी, विवेक आणि मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे गणेशोत्सवासारख्या उत्सवात विवेक पाळायला हवा. अलीकडे सोलापूरातील मंडळांनी व नागरिकांनी डीजेमुक्त गणेशोत्सवाची संकल्पना प्रत्यक्षात आणून दाखवली. आता पुणेकरांनीही रस्त्यावर उतरत पुढचे पाऊल टाकल्याचे दिसते. कोणतेही नेतृत्व वा पाठबळ नसताना जनता अशा प्रकारे रस्त्यावर उतरत असेल, तर त्याचा अर्थ राजकारण्यांनी व मंडळांनी समजून घेतला पाहिजे. आपल्या देशात जवळपास सर्वच सण, उत्सवांना वा जयंती सोहळ्यांना अनिष्ट रूप आले आहे. त्यामुळे जनता नाहक वेठीस धरली जाते. हे पाहता कायद्याने आखून दिलेल्या चौकटी कशा पाळल्या जातील, यावर प्रशासनाचा कटाक्ष हवा. मागच्या काही वर्षांत पुण्यासारख्या शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न तीव्र झाला आहे. देशातील बहुतेक शहरांमध्ये अशीच स्थिती पहायला मिळते. हे बघता सण, उत्सव जरूर साजरे व्हावेत. परंतु, डीजेला फाटा देत मर्यादित सदस्यसंख्येसहच पारंपरिक पथकांना परवानगी दिली जावी. अन्यथा, सोलापूरकर, पुणेकरांपाठोपाठ इतर शहरांतील सजग नागरिकही या मुद्द्यावर रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. एकूणच भूमिकावादी समाज, हे खऱ्या अर्थाने जिवंतपणाचेच लक्षण म्हणावे लागेल.