अध्याय तीन सारांश 3
आपण करत असलेल्या कर्माचे फळ भगवंतांना अर्पण करण्यातच आपले कसे भले आहे हे आपण समजून घेतले. पुढे भगवंत म्हणतात, प्रत्येकाला पूर्वकर्मानुसार ह्या जन्मीचा स्वभाव प्राप्त झालेला असतो. शिकलेला मनुष्यही त्याच्या स्वभावानुसार वागत असतो. त्यामुळे शिक्षणाच्या बळावर त्याने त्याच्या इंद्रियांना चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला तर ती बळजबरी केल्यासारखे होते. ह्याचा उलटा परिणाम होऊन कोंडून ठेवलेली इंद्रिये त्याला विषयसेवन करायला भाग पाडतात. त्यांनी दाखवलेल्या अमिषाला बळी पडून तो विषयसेवन करण्याचा प्रयत्न करतो. ते त्याच्या मनासारखे भोगायला मिळाले तर त्याला त्यांच्याविषयी प्रेम वाटू लागते आणि जर मिळाले नाहीत तर त्याला राग येतो. साधकाच्या मार्गात प्रेम आणि द्वेष हे चोरासारखे उभे असतात. म्हणून वेळीच धोका ओळखून सावध राहणे आवश्यक आहे.
भगवंतांनी नेमून दिलेल्या कामापेक्षा इतर काहीतरी करावे असे काहींना वाटत असते कारण सध्या करत असलेले कर्म ईश्वराने नेमून दिलेले आहे ह्याचा त्यांना विसर पडलेला असतो. वास्तविक ईश्वराने दिलेले काम त्यांचा उद्धार होण्यासाठी पूरक असते. ही गोष्ट लक्षात न घेता वाट्याला आलेल्या कामात काहीतरी उणे काढून ते अन्य काही करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपला उद्धार होण्याच्या दृष्टीने देवाने दिलेले काम करण्यातच आपले भले आहे हे ओळखून माणसाने अन्य काही उपद्व्याप करण्याच्या फंदात पडू नये. येथे असे मनात येईल की, आपली प्रगती होण्यासाठी अन्य कर्म करायला काय हरकत आहे. ह्यावर असे सांगता येईल की, अन्य कर्म करून कदाचित आर्थिक प्रगती होईलही परंतु आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर ईश्वराने दिलेले कर्म करणे हिताचे ठरते.
अर्जुनाने भगवंतांचे सांगणे लक्षपूर्वक ऐकले आणि त्याला असा प्रश्न पडला की, पाप कोणते, पुण्य कोणते हे सगळे लक्षात येऊनसुद्धा मनुष्य इच्छा नसतानाही वेठीला धरल्याप्रमाणे पापाचरण का करत असेल? उत्तरादाखल देव म्हणाले, माणसाचा रजोगुण प्रभावी झाला की, त्याला अनेक गोष्टी आपल्याला मिळाव्यात अशी इच्छा होऊ लागते आणि त्या मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करूनसुद्धा त्या मिळाल्या नाहीत तर त्याला राग येऊ लागतो. हा रजोगुण मोठा खादाड आणि पापिष्ट असतो. तो माणसाच्या ज्ञानाला झाकून टाकतो. त्यामुळे कितीही इच्छा पूर्ण झाल्या तरी त्याचे समाधान होत नाही. ज्याप्रमाणे अग्नीत इंधन टाकले की, तो अधिकच भडकतो त्याप्रमाणे एक इच्छा पूर्ण झाली की लगेच त्याच्या मनात दुसरी इच्छा जागृत होते आणि ह्या क्रमाला कधी अंत नसतो. माणसाची इंद्रिये, मन आणि बुद्धी ह्यांच्या आश्रयाने रहात असतो. म्हणून प्रथम माणसाने इंद्रियांना वश करून घ्यावे. त्यासाठी मनाचा निग्रह करावा. मनाच्या निग्रहासाठी आपण इंद्रियांच्या अधीन झालो तर आपला विनाश अटळ आहे हे लक्षात घ्यावे. मनाला आवर घालण्यात कमी पडल्यास माणसाने देवाचे श्रेष्ठत्व जाणून घ्यावे. त्याच्या नित्य स्मरणात रहावे. म्हणजे इंद्रियांनी आपल्याला दाखवलेले विषयांचे आकर्षण निष्प्रभ होऊन, आपल्याला होणाऱ्या इच्छांना आपोआपच आळा बसेल. इच्छांवर ताबा मिळवला की, क्रोध येत नाही. त्यासाठी ईश्वराकडे मदतीची याचना करावी.
अध्याय तिसरा सारांश समाप्त