अध्याय तीन, सारांश 2
मी ज्ञानमार्ग स्वीकारून, संन्यास घेतो म्हणजे मला कर्मत्याग करता येईल असे अर्जुन भगवंतांना म्हणू लागला. त्यात त्याची चूक कशी होत आहे हे भगवंत त्याला समजावून सांगत आहेत. ते म्हणाले संन्यास म्हणजे कर्मत्याग नव्हे तर कर्मफळाचा त्याग. त्यासाठी आधी कर्ममार्गाचे आचरण करणे उचित आहे. संपूर्ण निरपेक्ष झालास की तुझी देहबुद्धी नष्ट होईल त्यामुळे तू आत्मस्वरूप आहेस हे तुझ्या लक्षात येईल. ह्या ठिकाणी तुझे कर्तव्य संपुष्टात येईल. मग तू संन्यासी होशील. म्हणून तू सुरवातीला निरपेक्षपणे कर्म करण्याची सवय लावून घे. ही सवयच तुला मोक्षपद मिळवून देईल.
भगवंत पुढे म्हणाले, सांगायचे विशेष म्हणजे जनक महाराजांनी आणि त्यांच्याप्रमाणे वागणाऱ्या अनेकांनी अशा पद्धतीनेच सिद्धी मिळवली म्हणून तुही लोकसंग्रह आणि धर्मपालन ही उद्दिष्टे ठेवून कर्म कर. मोठे लोक ज्याप्रमाणे वागतात त्याप्रमाणे इतर लोक वागतात. मलाही काही मिळवायचे नसले तरी मी कर्म करतोच आहे कारण मी जर कर्म केले नाही तर लोकही कर्म करणार नाहीत. मी जर कर्म करायचे टाळले तर सगळीकडे निर्नायकी होऊन वर्णसंकर होईल. त्याद्वारे सर्वांचा घात होऊन मी त्याला कारणीभूत होईन.
कर्मफळाच्या अपेक्षेत गुंतून अज्ञानी लोक कर्म करत असतात पण ज्याला निरपेक्षतेने कर्म करण्याचे महत्त्व समजले आहे त्याने मात्र लोकसंग्रह करण्यासाठी कर्म करावे. मात्र असे कर्म करत असताना आपण काहीतरी विशेष करतोय असे समजून जे फळाच्या अपेक्षेने कर्म करत आहेत त्यांना हिणवू नये. म्हणून त्यांचा बुद्धिभेद न करता त्यांना स्वत: समबुद्धीने कर्म करायचे प्रात्यक्षिक दाखवून ते करत असलेल्या कर्माची गोडी लावावी. त्यांच्या जेव्हा हे लक्षात येईल की ते करत असलेली कर्मे प्रकृतीच्या गुणांमुळे होत आहेत त्यावेळी ते सावध होतील. ते म्हणतील मी प्रकृतीच्या गुणांपेक्षा वेगळा आहे तेव्हा गुण जरी गुणाप्रमाणे वागले तरी मी त्यात गुंतणार नाही. म्हणून गुणात गुंतून जे कर्म करत आहेत त्यांना ते तसेच करत राहू द्यावे म्हणजे आपोआपच त्यांना त्यातील निरर्थकता लक्षात येईल.
तू स्वत:ची आत्मस्वरूप ही ओळख लक्षात घेऊन करत असलेली कर्मे, त्याबद्दलची फळाची अपेक्षा आणि कर्माबद्दल वाटत असलेले प्रेम सोडून ती सर्व मला अर्पण कर. आत्ता ह्याक्षणी युद्ध करणे हा तुझा स्वधर्म आहे तो पार पाडण्यातच तुझे कल्याण आहे. आपण सगळ्यांनीही करत असलेली कर्मे ईश्वराला अर्पण करू आणि कर्मबंधनातून सुटका झाल्याच्या आनंदात राहू. पुढे भगवंत म्हणाले, जे माझ्या उपदेशाचे श्रद्धेने पालन करतील त्यांची कर्मबंधने आपोआपच तुटतील परंतु जे माझा दुस्वास करून माझा उपदेश धुडकावून लावतील ते अज्ञानी मूढ लोक मात्र नाश पावतील.
आपल्या देहाचे संपूर्ण नियंत्रण भगवंतांच्या हातात आहे. त्यामुळे देहाला त्यांनी नेमून दिलेली कार्ये केल्यावर त्याचे फळही त्यांचेच आहे. कर्म त्यांचेच आहे तरी फळही त्यांचेच असणार हा व्यवहारातला नियम येथेही लागू पडतो. म्हणून आपल्या देहाने, केलेल्या कर्माचे फळ हे देवाच्या मालकीचे आहे हे लक्षात घेऊन ते आपण देवाला अर्पण करण्यातच आपले भले आहे. आपण तसे केले नाही तर आपण आत्मस्वरूप आहोत ह्या गोष्टीचा आपल्याला विसर पडल्यासारखे होते. म्हणून अशा व्यक्तीला भगवंत मूढ म्हणतात. आपला उद्धार व्हावा अशी त्यांची इच्छा असली तरी आपण आपल्या कृतीने त्यावर पाणी ओतत असल्याने आपला विनाश अटळ असतो.
क्रमश: