For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अध्याय तिसरा सारांश 1

06:33 AM Jan 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
अध्याय तिसरा सारांश 1
Advertisement

भगवंत अर्जुनाला म्हणाले की, तुझे खरं स्वरूप आत्मा हे असून ह्या जन्मासाठी तुझी अर्जुन म्हणून ओळख आहे तसेच तू ज्यांच्याबरोबर लढणार आहेस ते ह्या जन्मापुरते ते तुझे नातेवाईक आहेत. त्यांनी अन्यायी वर्तणूक केल्यामुळे त्यांना शासन करणे हे तुझे कर्तव्य आहे म्हणून तुला युद्ध करावे लागेल. पुढे म्हणाले, कोणते कर्म करायचे आणि कोणते नाही हे ठरवणारी बुद्धी कर्मापेक्षा श्रेष्ठ असते म्हणून बुद्धी सांगते त्याप्रमाणे वाग. असे असले तरी, समोर दिसत असलेल्या नातेवाईकांशी कर्तव्य म्हणून युद्ध करून त्यांना ठार मारणे अर्जुनाला योग्य वाटत नव्हते. म्हणून तो भगवंतांना म्हणाला, देवा तुम्ही कर्मापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे असे सांगताय ना, मग मला माझी बुद्धी युद्ध करू नकोस असे सांगत आहे पण तुम्ही मला युद्ध कर असे सांगत आहात ते कसे?

Advertisement

त्यावर भगवंत म्हणाले, मनुष्य जन्माचे सार्थक करून घेण्याचे ज्ञान आणि कर्म हे दोन मार्ग आहेत. कर्म करून जे फल प्राप्त होते तेच ज्ञानी माणसाला प्राप्त होते. मात्र सुरवातीलाच मी ज्ञानमार्गाने जाऊन जीवनाचे सार्थक करून घेईन असे एखादा म्हणू लागला

तर ते शक्य होत नाही. म्हणून माणसाने सुरवातीला कर्ममार्गाचे आचरण करावे. कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्म करण्याची सवय लावून घ्यावी. त्याप्रमाणे कर्म करायला मनुष्य तयार झाला की, त्याला नैष्कर्म्य असे म्हणतात. म्हणून वाट्याला आलेले कर्म टाळण्याचा कुणी प्रयत्न करू नये कारण कर्म करूनच नैष्कर्म्य प्राप्त होते. तसेही माणसाला कर्माविण राहणे शक्य होत नाही कारण प्रकृतीच्या गुणानुसार त्याचा स्वभाव तयार झालेला असतो आणि तो त्याला कर्म करायला भाग

Advertisement

पाडतो.

म्हणून मी कर्म करणार नाही असे म्हणणारा निरर्थक बडबड करत असतो कारण त्याची इंद्रिये त्याला स्वस्थ बसू देत नाहीत. मात्र जो इंद्रियांवर ताबा मिळवून त्यांच्याकडून योग्य ते कर्म करून घेतो त्याला विशेष मान मिळतो. म्हणून तू तुझ्या वाट्याला आलेले कर्म किंवा तुला ईश्वराने नेमून दिलेले कर्तव्यकर्म तू जरूर कर. त्यातच तू मुक्त होण्याचे रहस्य दडलेले आहे.

ह्याबाबत मी तुला एक कथा सांगतो. जेव्हा ब्रह्माने विश्वनिर्मिती केली तेव्हा प्रजेबरोबर बोलताना तो म्हणाला होता की, तुम्ही ईश्वराने नेमून दिलेले कर्म करत रहा. हेच कर्म तुम्हाला कामधेनुप्रमाणे हवे ते मिळवून देईल. त्या कामासाठी इतर देव तुम्हाला मदत करतील.

तुम्हीही त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगा. अशा पद्धतीने दोघेही एकमेकांचे रक्षण करा. तुम्ही करत असलेल्या कर्तव्यपालनाने देव तुष्ट होतील आणि तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू पुरवतील. त्यांनी तुम्हाला दिलेल्या वस्तूतील त्यांचा वाटा त्यांना जरूर द्या. असे जे करणार नाहीत ते आपोआपच चोर ठरतील. देवांना देऊन जे उरलेले स्वत: खातील ते निर्दोष होतील आणि त्यांना न देता जे स्वत:च सर्व खातील ते जणू पापच भक्षण करतील.

पुढे ब्रह्मदेवानी देवता त्यांना अन्नसाखळीच्या माध्यमातून कशी मदत करतात ते सांगितले. ते म्हणाले, सुरवातीला फक्त ब्रह्मच होते मग ब्रह्माने प्रकृती म्हणजे मायेची निर्मिती केली. मायेने कर्माची निर्मिती केली.

सूर्यदेवाच्यामुळे पाऊस पडून शेतात धान्य पिकू लागले. त्यातून झालेल्या अन्नाच्या निर्मितीतून सर्वांचे पालनपोषण होऊ लागले. ईश्वराने निर्माण केलेले हे चक्र चालवण्यात जो अडथळे निर्माण करतो तो इंद्रियांच्या सांगण्याप्रमाणे वागून, पापकर्मात व्यर्थ जीवन घालवतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.