For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अध्याय सातवा सारांश भाग दोन

06:30 AM Aug 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
अध्याय सातवा सारांश भाग दोन
Advertisement

भगवंत म्हणाले, ज्ञानी, जिज्ञासू व्हीव्हल आणि आर्त असे चार प्रकारचे सदाचारी भक्त माझी भक्ती करत असतात कारण त्यांचा माझ्यावर विश्वास असतो. काही लोकांच्या इच्छा त्यांच्या दृष्टीने इतक्या जबरदस्त असतात की, त्या माझ्याकडून पूर्ण होणार नाहीत अशी खात्री वाटून ते त्यासाठी अन्य दैवते शोधतात. वास्तविक पाहता ह्या दैवतांची निर्मिती मीच केलेली आहे. ते कुठल्या ना कुठल्या दैवताची भक्ती करत आहेत ही बाब लक्षात घेऊन मी अशा कामनाग्रस्त लोकांची ज्या दैवतावर श्रद्धा असते ती तशीच रहावी म्हणून मी त्यांना हवे असेल ते देतो. त्यांना जे हवे असते त्याचीही निर्मिती मीच केलेली असते. त्यांच्या अल्पबुद्धीमुळे माझे विश्वव्यापी स्वरूप त्यांच्या लक्षात येत नाही, तसेच केवळ मीच त्यांना कायम टिकणारे फळ देऊ शकतो हेही ते समजू शकत नाहीत. म्हणून ते तात्पुरत्या फळाच्या अपेक्षेने माझ्याऐवजी अन्य दैवतांची भक्ती करतात. असे भक्त मृत्यूनंतर त्या त्या देवांचे निवासस्थान जेथे असते तेथे जातात पण माझी भक्ती करणारे मात्र मला येऊन मिळतात.

Advertisement

पुढे भगवंत म्हणतात, माझे समोर दिसणारे सगुण रूपच बुद्धीहीन लोकांना खरे वाटते. माझे न दिसणारे निर्गुण, निराकार रूप ते जाणत नाहीत. मी योगमायेने वेढलेला असल्याने जगाला दिसू शकत नाही. मला जन्म-मरण नसल्याने नित्य म्हणजे कायम आहे हे मूढ लोक ओळखू शकत नाहीत. ते त्यांच्या आत्मस्वरुपाला विसरलेले असल्याने त्यांना माझे विश्वव्यापी स्वरूप लक्षात येत नाही. त्यामुळे समोर दिसणाऱ्या विश्वाच्या मोहात ते पडलेले असतात. अशाप्रकारे झालेल्या आणि पुढे होणाऱ्या सर्वांना मी जाणून आहे पण मला मात्र कोणी जाणत नाहीत. माझ्या अखिल विश्वाच्या प्रपंचातले सर्वजण मायेच्या करामतीमुळे इच्छा, द्वेष, सुख, दु:ख ह्या विकारांनी ग्रस्त असतात. त्यामुळे त्यांच्या चित्तात द्वंद्व आणि मोह ह्यांनी घर केलेले असते. समोर दिसणारे विश्वनाट्या त्यांना खरे वाटत असते. त्यांच्या वाट्याला आलेली विश्वनाट्यातली भूमिका ते खरी समजतात आणि स्वत:ला कर्ता समजून ती भूमिका समरसून वठवू लागतात. त्यामुळे ते त्यात अधिकाधिक गुंतत जातात.

ज्यांना ह्या नाट्याची कल्पना येते ते पुण्यकृत्ये करून पापकर्माचा प्रभाव कमी करू लागतात. जसजसा पापकर्माचा प्रभाव कमीकमी होत जातो तसतसे त्यांच्यातील द्वंद्व-मोह नाहीसा होतो आणि ते माझी निश्चयपूर्वक भक्ती करू लागतात. आता मला फक्त तूच हवास अन्य काहीही नको अशा भावाने ते माझी भक्ती करत करत माझ्याशी अनन्य होतात. माझ्या पायाशी आश्रय घेतात. माझी प्राप्ती करून घेऊन ते म्हातारपण आणि मृत्यू ह्यांच्यावर मात करतात. जसजसे माणसाचे वय वाढू लागते तसतशी त्याला म्हातारपणातील परावलंबीत्व आणि सरतेशेवटी येणारा मृत्यू ह्याची भीती वाटू लागते. माझ्या अनन्य भक्तांनी मात्र ब्रह्म आणि अध्यात्म म्हणजे काय ते जाणल्यामुळे त्यावर मात केलेली असते. प्रयाणकाळी ते सावध असल्याने त्यांना माझे स्मरण होते.

Advertisement

अध्याय सातवा सारांश समाप्त

Advertisement
Tags :

.