For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठीला समर्पित ज्ञानाचा अध्याय संपला!

06:15 AM Aug 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
मराठीला समर्पित ज्ञानाचा अध्याय संपला
Advertisement

मराठी भाषा म्हणजे केवळ संवादाचे साधन नाही; ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक स्मृतीची, विचारांची आणि अस्मितेची वाहक आहे. या भाषेच्या जतनासाठी अनेकांनी आयुष्य खर्ची घातले. मात्र भाषेवर प्रेम करणे आणि भाषेच्या शिस्तीसाठी आयुष्यभर तपश्चर्या करणे यात फरक आहे. प्रा. डॉ. यास्मिन शेख यांनी दुसरा मार्ग स्वीकारला. वयाच्या 101व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि मराठी भाषेच्या अभ्यासविश्वातील एका प्रदीर्घ, निष्ठावान आणि विलक्षण ज्ञानसाधनेचा अध्याय संपला. यास्मिन शेख यांचे मूळ नाव जेरुशा रुबेन. जन्माने ज्यू कुटुंबातील ही मुलगी पुढे मराठीची व्याकरणतज्ञ बनते, हा केवळ विलक्षण योगायोग नाही; तो भारताच्या बहुविध आणि समावेशक संस्कृतीचा अर्थ सांगणारा प्रसंग आहे. स. प. महाविद्यालयात शिक्षण घेताना श्री. म. माटे यांच्यासारख्या शिक्षकांचा त्यांना लाभ झाला. मराठी व्याकरणाची गोडी तिथेच लागली. पुढे भाषाशास्त्राचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी डेक्कन कॉलेजचा मार्ग धरला. आवड हळूहळू अभ्यासात आणि अभ्यास पुढे जीवनध्येयात परिवर्तित झाला. मुंबईतील एसआयईएस महाविद्यालयातील सुमारे 28 वर्षांचे अध्यापन, त्यातील मराठी विभागप्रमुख म्हणून केलेले काम, त्यापूर्वीचे मिलिंद महाविद्यालयातील अध्यापन आणि निवृत्तीनंतरही स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना भाषाशास्त्र व व्याकरण शिकविणे, हा त्यांच्या कार्याचा विस्तार थक्क करणारा. सुमारे 34 वर्षांच्या अध्यापन कारकीर्दीत त्यांनी व्याकरणाला केवळ नियमांचा विषय न ठेवता भाषेची रचना समजून घेण्याचा विषय केला. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्दलेखनकोश’ ही त्यांची पुस्तके मराठी लिहिणाऱ्या प्रत्येकासाठी संदर्भग्रंथ ठरली. शब्द कसा लिहावा, वाक्य कसे रचावे, प्रमाणलेखनात नेमकेपणा कसा आणावा, याचे शास्त्राrय मार्गदर्शन त्यांनी केले. ‘शब्दलेखनकोश’ तयार करणे हे वरवर सोपे वाटले तरी त्यामागे शब्दांच्या वापराचा, उच्चाराचा, परंपरेचा आणि प्रमाणाचा प्रचंड अभ्यास असतो. म्हणूनच या कार्याचे महत्त्व मोठे आहे. ‘व्याकरणाला भाषाविज्ञानाची जोड दिली, तर ते मुलांना समजणे सोपे जाते,’ हा त्यांचा विचार आजच्या शिक्षणपद्धतीसाठीही महत्त्वाचा आहे. व्याकरण म्हणजे शिक्षा किंवा पाठांतर नव्हे, तर भाषा समजून घेण्याची गुरुकिल्ली आहे, हे त्यांनी आपल्या अध्यापनातून दाखवून दिले. त्यांनी प्रमाणभाषेचा आग्रह धरला; पण बोलीभाषांचा तिरस्कार केला नाही. ललित आणि वैचारिक लेखनात प्रमाणभाषेची शिस्त आवश्यक असली, तरी बोलीभाषा ही लोकजीवनाची जिवंत अभिव्यक्ती आहे, याचे भान त्यांच्या विचारांत होते. बालभारतीच्या मराठी पाठ्यापुस्तकांच्या संपादनात त्यांनी सात वर्षे योगदान दिले. ‘कार्यात्मक व्याकरण’च्या निर्मितीतही त्यांचा सहभाग होता. ‘अंतर्नाद’ मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून त्यांनी लेखनाची शुद्धता जपली. अगदी वृद्धावस्थेतही वृत्तपत्रीय सदरातून त्यांनी भाषिक प्रश्नांवर लेखन केले. त्यांच्या कार्याला महाराष्ट्र शासनाचा डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार, तसेच इतर जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 2025 मध्ये त्यांना ‘मराठी भाषा जीवनगौरव’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले. यास्मिन शेख यांचे जीवन आजच्या समाजाला आणखी एक मोठा धडा देते. भाषा कोणाच्या धर्माची किंवा जातीची मत्तेदारी नसते. जन्माने ज्यू असलेल्या जेरुशा रुबेन यांनी मराठीला आपलेसे केले आणि पुढे मराठीच्या व्याकरणाला स्वत:चे आयुष्य दिले. त्यांच्याच शब्दांत, “मराठी ही केवळ माझी भाषा नाही, ती केवळ तुमची भाषा नाही, ती आपली भाषा आहे.” ज्या भाषेतून आपल्या अनुभवांना, भावनांना आणि विचारांना अभिव्यक्ती मिळते, ती भाषा आपली होते. सामाजिकदृष्ट्या भाषा हा आद्य, सर्वश्रेष्ठ संस्कार आहे, असे त्या मानत. म्हणूनच मराठीच्या रक्षण,संवर्धनासाठी सर्व भाषाप्रेमींनी आवाज उठवावा, विशेषत: तरुणांनी मराठीचा सुंदर, सक्षम आणि अभिमानास्पद वापर व्यवहारात व लेखनात करावा, असा त्यांचा आग्रह होता. आज मराठीसमोर डिजिटल युगातील नव्या आव्हानांचा डोंगर आहे. इंग्रजी-मराठी मिश्र भाषा, घाईघाईचे लेखन, चुकीचे शुद्धलेखन, ध्वन्यात्मक टंकलेखन आणि समाजमाध्यमांवरील भाषिक बेफिकिरी वाढत आहे. अशा काळात यास्मिन शेख यांचे कार्य केवळ स्मरण करण्यापुरते नाही; ते पुन्हा वाचण्याचे, शिकण्याचे आणि आचरणात आणण्याचे आहे. भाषेचा दर्जा टिकविणे म्हणजे केवळ शुद्ध शब्द लिहिणे नव्हे; तिच्या विचारक्षमतेला, सौंदर्याला आणि अभिव्यक्तीच्या सामर्थ्याला जिवंत ठेवणे होय. एका शतकाचे आयुष्य संपले; पण भाषेची सेवा संपलेली नाही. यास्मिन शेख गेल्या, त्यांच्या हातातील लेखणी थांबली; मात्र त्यांनी घडविलेली भाषिक शिस्त, पुस्तके, विद्यार्थी आणि विचार पुढे चालत राहतील. मराठीच्या अंगणात त्यांनी ज्ञानाचा जो दिवा लावला, तो पुढच्या पिढ्यांनी जपला तरच त्यांच्या ज्ञानसाधनेला खरी आदरांजली ठरेल. मराठीवर प्रेम करण्याची आणि ती जबाबदारीने लिहिण्याची प्रतिज्ञा हीच यास्मिन शेख यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.