अध्याय नऊ सारांश 1
ह्या अध्यायाचे नाव ज्ञातृज्ञेयविवेकयोग असे आहे. अध्यायाच्या सुरवातीला वरेण्याने विचारले, बाप्पा तुमची सगुण रुपात पूजा करणारा आणि तुम्हाला निर्गुण, निराकार रुपात पूजणारा ह्या दोन्ही भक्तांपैकी तुम्हाला कोण श्रेष्ठ वाटतो? वरेण्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना बाप्पा म्हणाले, राजा जो माझी सगुण रुपात पूजा करतो तो मला श्रेष्ठ वाटतो. ह्याचं कारण असं की, माणसाने स्वत:चा उद्धार करून घ्यावा अशी माझी इच्छा असते आणि माझी सगुण रुपात पूजा करण्यास सुरवात करून तो माझ्याकडे येण्याच्या वाटचालीला सुरवात करतो. सगुण रुपात माझी पूजा करणारा भक्त माझ्या भक्तीत तल्लीन झाला की, त्याला माझ्या निर्गुण, निराकार रुपाची जाणीव होऊन तो माझ्या निराकार रुपाची उपासना करू लागतो. त्याचा मी उद्धार करतो. अर्थात माझ्या निर्गुण रुपाची उपासना करणे कठीण आहे म्हणून जो अनन्यभावाने माझ्या सगुण रुपाची उपासना करतो त्याचाही मी उद्धार करतो. माझ्या उपासनेत विद्वत्तेला महत्त्व नसून माझ्यावर भक्तीयुक्त अंत:करणाने प्रेम करण्यालाचा जास्त महत्त्व आहे. म्हणून अडाणी भक्तालाही माझी प्राप्ती होऊ शकते. जो माझी भक्ती करण्याचे नाटक करत असतो तो ढोंगी समजावा पण एखादा प्रारब्धानुसार हलकी कामे करणारा मनापासून माझी भक्ती करत असेल तर तो मला ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ वाटतो. माझी भक्ती करूनच शुक, संत, नारद अशा श्रेष्ठ मुनींनी मोक्ष मिळवला.
म्हणून वरेण्या तू मन आणि बुद्धी मला अर्पण कर आणि माझी भक्ती करून मोक्ष मिळव. तुझे मन आणि बुद्धी तू मला अर्पण करू शकत नसशील तर अभ्यास आणि योग ह्यांच्या मदतीने मला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न कर. हेही तुला जमण्यासारखे नसेल तर तू करत असलेली सर्व कर्मे मला अर्पण कर. हेही शक्य नसेल तू करत असलेल्या कायिक, वाचिक, मानसिक कर्मांच्या फलाचा त्याग कर.
शांतीचे महत्त्व राजाच्या मनावर ठसवताना बाप्पा म्हणाले, माझ्यावर निष्ठा ठेवणारी बुद्धी श्रेष्ठ असते, त्याहून ध्यान आणि ध्यानापेक्षा सर्वस्वपरित्याग श्रेष्ठ असतो तर शांतीला मी सर्वश्रेष्ठ मानतो.
येथून पुढे बाप्पा त्यांना कोणत्या प्रकारचा भक्त आवडतो ते सांगत आहेत. ते म्हणाले, ज्याला मी कर्ता आहे असे वाटत नाही, ज्याला कुणाकडून कसलीही अपेक्षा, ज्याला कुणाचाही द्वेष वाटत नाही, ज्याचे कुणाशी शत्रुत्व अथवा मित्रता नाही, ज्याला कशातही लाभ-हानी, सुख-दु:ख, मानापमान वाटत नसल्याने जो तटस्थ असतो, ज्याला पाहून लोक घाबरत नाहीत, जो स्वत:ही लोकांना घाबरत नाही, उद्वेग, भीती, क्रोध, आनंद ह्या भावना ज्याला शिवतसुद्धा नाहीत. जो शत्रू-मित्र, निंदा-स्तुती ह्या सर्व गोष्टी मनाला लावून घेत नाही, जो सतत मौनात असतो.
ज्याची बुद्धी विचलित होत नाही, ज्याने सर्वसंगपरित्याग केलेला आहे, जो माझ्यावर श्रद्धा ठेऊन मी केलेल्या उपदेशाचा अभ्यास करून त्याप्रमाणे आचरण करतो आणि त्यामुळे लोकांना वंदनीय होतो. जो नको असलेले वाट्याला आले म्हणून त्याचा द्वेष करत नाही किंवा हवे असलेले मिळाले म्हणून हुरळून जात नाही, ज्याला क्षेत्र-क्षेत्रज्ञाचे ज्ञान असते असा भक्त मला अतिशय प्रिय असतो. भगवद्गीतेत ह्यालाच धर्मसार असे म्हंटलेले असून त्याचे जो नित्य सेवन करेल तो भगवंतांना प्रिय होतो. हे लक्षात घेऊन बाप्पांना प्रिय होण्यासाठी वरील गुण आत्मसात करण्याचा भक्ताने प्रयत्न करावा.
बाप्पांनी शेवटी सांगितले आहे की, ज्याला क्षेत्र-क्षेत्रज्ञाचे ज्ञान असते तो त्यांना प्रिय होतो. हे ऐकल्यावर वरेण्याची जिज्ञासा जागृत झाली अन त्याने बाप्पांना विचारले, बाप्पा क्षेत्र कशास म्हणतात आणि त्याचा ज्ञात कोण असतो हे मला समजावून सांगा.
क्रमश: