पहिल्याच पावसात उडाली दैना !
कोल्हापूर / संतोष पाटील :
शहरातील नाले गाळाने भरले आहेत. अमृतसह गॅस योजनेसाठी केलेल्या खोदाईनंतर रिस्टोलेशनचा दर्जा नसल्याने सर्वच प्रमुख रस्त्यांवर फुटभर पाणी साचत आहे. नाल्यात शेकडो टन प्लास्टिक असल्याने पाणी साचत नाही, असा चौक नाही. परिणामी, मंगळवारच्या धुवाँधार पावसात अनेक घरात आणि दुकानात पाणी शिरले. शहरवासियांची पहिल्या पावसाने दैना उडवून दिली. यंदाच्या वर्षी 100 टक्के मान्सून बसरणार असल्याचा अंदाज आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, यंत्रणेसह शहरवासियांनी त्रुटी सुधारल्या तरच पावसाळा सुसह्य होईल, असेच गेल्या दोन दिवसांतील पावसाने दाखवून दिले आहे.
शहरातील जयंती, गोमती, शाम सोसायटी या प्रमुख नाल्यांची लांबी 22 किलोमीटर आहे. या नाल्यातून पाण्याचा प्रवाह विनाअडथळा गेला तरच पाणी नदीपर्यंत जाईल, अन्यथा यातील पाणी आजूबाजूच्या वस्तीत शिरणार असल्याचे 2019 पासून तीन वेळा महापूरात सिध्द झाले आहे. या तीन नाल्यातील 16 किलोमीटरपर्यंत 18 हजार टन गाळ काढला आहे. त्यात 6 हजार टन प्लास्टिक होते. शुतार मळा येथे जयंती नाल्यात सुमारे तीन फुटांचा प्लास्टिकचा थर साचला आहे. 2 हजार टन प्लास्टिक एकाच ठिकाणाहून निघाले. नाल्यासह गटारीत सॅनिटरी नॅपकीन, बांधकाम, बायोमेडीकल वेस्ट आणि हॉटेल वेस्ट मोठ्या प्रमाणात निघत आहे.
शहरातील सुमारे 450 किलोमीटरचे रस्ते अमृत पाणी योजना आणि ड्रेनेज लाईनसाठी गेल्या दोन वर्षात खोदले आहेत. मुख्य रस्त्यावरील खोदकामानंतर दुरुस्तीकडे एकतर पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, किंवा तीन-तीन वेळा काम करुनही दर्जा नाही. महापालिका प्रशासनाचे या कामावरील नियंत्रण सुटल्यानेच रस्ते खड्ड्यात गेले. खचू लागले. त्यामुळेच सुमारे 125 कोटी रुपये खर्चाची अमृत योजना शहरवासियांना विषासमान भासत आहे. गॅसलाईनसाठी केलेल्या खोदाईचा रिस्टोरेशनचा दर्जा नसल्याने रस्त्यावरच पाणी साचत आहे. शहरातील सर्वच रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात खरमाती आणि गाळ पडला आहे. त्याची वेळेत उचल झाली नसल्याने पाणी रस्त्यावरच साचत आहे, परिणामी घरे आणि दुकानात पाणी शिरत आहे.
कोल्हापूरच्या तिन्ही बाजूने पंचगंगा नदी आणि डोंगराळ भाग आहे. यामध्ये वसलेल्या कोल्हापूरला पावसाच्या अतिरिक्त झालेल्या पाण्याचा निचरा आपोआप होण्याचे वरदान लाभले. कोल्हापुरात कितीही मोठा पाऊस झाला तरी त्याची चिंता करण्याचे कारण ना शहरवासियांना होते ना प्रशासनाला. मात्र, आता अवघ्या अर्ध्या तासाच्या मुसळधार पावसात शहरातील रस्त्यांना डबक्याचे रुप येत आहे. यापूर्वी संपूर्ण शहरात पाच ते सात ठिकाणच्या चौकात पाणी साचत होते. आता पाणी साचणाऱ्या जागांचा आकडा शेकड्यांत गेला आहे. पावसाचे पाणी साचत असताना कोट्यावधी रुपये खर्चून त्यासाठी उपाययोजनाही केल्या. मात्र, महापुरात सोडाच हलक्या पडणाऱ्या पावसात साचणारे पाणी या योजनांचा फोलपणा ठळकपणे दाखवून देत आहे.
- योजना तकलादू
कळंबा तलावापासून पंचगंगेपर्यंत तब्बल 27.4 किलोमीटर शहरातून प्रवास करीत शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जयंती नाला वाहतो. शहरातील सर्व पेठा आणि उपनगरातील लहान-मोठ्या नाल्यांसह प्रमुख 13 नाले जयंती नाल्याला मिळतात. कितीही मोठा पाऊस झाला तरी पाणी साचणार नाही, अशी नैसर्गिक रचना शहराला लाभली. मात्र गेल्या काही वर्षात शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून अवस्था दलदलीच्या भूभागासारखी होत आहे. यास अवास्तव नागरिकरणाच्या जोडीला आंधळेपणाने राबवलेल्या योजना कारणीभूत ठरत आहेत.
- पाणी पातळी कमी तरीही
शहरात सुतार मळ्यासह अनेक भागात पंचगंगा 43 फुटांवर गेल्यावर 2019 मध्ये पाणी आले होते. मात्र 2024 मध्ये याच भागात पंचगंगा 39 फुटांवर असताना पाणी आले. शिये बावडा रस्ता 45 फुटांवर बंद होत असे, तो आता 40 फुटांवरच बंद होत आहे. याला नदी क्षेत्रातील भराव आणि गाळाने भरलेले नाले कारणीभूत आहेत.
- यंदा 100 टक्के पाऊस
हा मान्सूनपूर्व पाऊस आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या शक्ती वादळामुळे अजून 2-3 दिवस जिह्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अजून पुढील आठवड्यात एका वादळाचे संकेत असून मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो. कोल्हापुरात मान्सून 10 जूननंतरच सक्रिय होणार आहे. यंदा 100 टक्क्याहून अधिक पावसाचा अंदाज असल्याने सजग राहणे गरजेचे आहे.
- प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी