धांदल ऑनलाईन, ऑफलाईन प्रवेशाची
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
अकरावी, आयटीआय, तंत्रनिकेतन आणि पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशन केंद्राची निर्मिती केली आहे. तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. पहिल्या दिवशी एकाचवेळी राज्यभरातील विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरत असल्याने संकेतस्थळ ओपनच होत नव्हते. परंतू बुधवारी ऑनलाईन अर्ज भरण्यास अडचण आली नाही. तर अकरावी प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी लिंक ओपन होत नसल्याने प्रवेशाचा बट्ट्याबोळ झाला. सकाळी दहा वाजल्यापासून विद्यार्थी नेटकॅफेमध्ये बसून होते तरीही लिंक ओपन झाली नसल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. पदवी प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सीची प्रवेश प्रक्रिया कॉलेजपातळीवर असल्याने विद्यार्थ्यांना अडचण आली नाही. परंतू विद्यार्थी काही विषयांचा आग्रह प्राचार्यांकडे करीत असल्याचे निदर्शनास आले.
अकरावी प्रवेशाची लिंकच ओपन झाली नाही अकरावी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या ऑनलाईन प्रवेश https://mahafyjcamissions.in या संकेतस्थळावर सुरू झाले. सकाळी दहा वाजल्यापासून विद्यार्थी व पालक नेटकॅपेमध्ये बसून होते परंतू लिंकच ओपन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरूण भारत संवादशी बोलताना विद्यार्थी व पालकांनी अकरावी ऑनलाईन प्रवेशासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कोल्हापूर शहरात तीन समुपदेशन केंद्राची स्थापना केली आहे. या समुपदेश केंद्रावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञांची नियुक्ती केली आहे. ही समिती विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करीत आहे. यामध्ये शहरातील कॉलेजसाठी केएमसी कॉलेजवर समुपदेशन कक्ष आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी एस. एम. लोहिया कॉलेजवर समुपदेशन केले जाते. तसेच दोन्ही केंद्रावर न्याय मिळत नसेल तर मेन राजाराम कॉलेजमधील मध्यवर्ती समुपदेशन केंद्राला विद्यार्थी व पालकांनी भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले.
पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने बारावीनंतर शिवाजी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी बीए., बीकॉम., बीएस्सी. ला प्रवेश घेतात. काही महाविद्यालयांनी पदवी व पदव्युत्तर विषयांची ऑनलाईन तर काही महाविद्यालयांनी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली आहे. ऑनलाईन प्रवेश देण्याची सोय महाविद्यालयानेच केली असल्याने विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होत नाही. तर ऑफलाईन प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयातील छापील अर्ज भरून पूरक कागदपत्रे जोडून शुल्कासह महाविद्यालयातील कार्यालयात जमा करावयाचा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सोयीची ठरत आहे.
महाविद्यालयातील प्रवेश समितीतील तज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करीत असल्याचे निदर्शनास आले. तर एखादा विषय बदलून पाहिजे असेल तर प्राचार्यांचा सल्ला घेवून संबंधीत विद्यार्थ्यांना प्राध्यापक न्याय देत असल्याचे दिसून आले.
- अकरावी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लिंकच ओपन नाही
सकाळी दहा वाजल्यापासून अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी नेटकॅफेमध्ये येवून बसलो आहोत. परंतू प्रवेशाची लिंकच ओपन होत नाही. आम्ही कसा ऑनलाईन प्रवेश घ्यायचा. शिक्षण उपसंचालक कार्यालयानेच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची सोय करावी.
सर्वेश वर्णे (विद्यार्थी, जिवबानाना जाधव पार्क)
- अकरावी प्रवेशाचा मनस्ताप
अकरावी प्रवेश घेण्यासाठी सुरूवातीला सराव करून घेतला, सराव अर्ज डिलिट करून पुन्हा अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या. मी आणि माझी आई सकाळी साडेदहा वाजल्पासून नेट कॅफेत बसून आहे, परंतू प्रवेशाची लिंकच ओपन होत नाही. नेटवर साईट अंडर मेंटनन्स असा मेसेज येत आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थी व पालकांना अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा मनस्ताप होत आहे.
आदिती खोत (गंगावेश)
- पावसातही प्रवेशाला गर्दी
बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती, तरीदेखील छत्री, रेनकोट घेवून विद्यार्थी व पालक कॉलेजमध्ये व नेटकॅफेत हजेरी लावत होते. पावसाची उघडझाप असल्याने प्रवेशाची माहिती घेईपर्यंत पाऊस यायचा. पाऊस उघडेपर्यंत कॉलेजमध्ये थांबून पाऊस उघडल्यानंतर विद्यार्थी जात होते. पावसाही प्रवेशाला चांगलीच गर्दी होती.