मुख्यमंत्री मान यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ
वादविवादासाठी पोहोचले केंद्रीय मंत्री बिट्टू
वृत्तसंस्था/ चंदीगड
चंदीगडमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यालयाबाहेर बुधवारी गोंधळ झाला. रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू हे मुख्यमंत्री कार्यालयात त्यांच्याशी डिबेट (वादविवाद) करण्यासाठी पोहोचले होते. रवनीत बिट्टू पोहोचल्याचे कळताच पोलिसांनी पूर्ण परिसरातील सुरक्षा वाढविली. तेथील गोंधळ सुमारे एक तासभर सुरू होता.
बिट्टू यांना मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यापासून पोलिसांनी रोखले, यामुळे बिट्टू आणि पोलीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी बिट्टू यांच्या ताफ्याला रोखल्याने त्यांचे सुरक्षापथक आणि पोलिसांदरम्यान झटापटही झाली. बिट्टू हे सुमारे तासभर मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर होते, परंतु त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात बोलाविले गेले नाही. स्वत:च्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी बिट्टू तेथे पोहोचले होते.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लुधियाना विद्यापीठात रिकाम्या खुर्च्या ठेवायला लावलया, आणि आपल्याशी कुणी डिबेट करू शकत नसल्याचे म्हटले. आता मी मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर डिबेटसाठी उभा आहे, तर मुख्यमंत्री मान हे कार्यालयात लपून बसले आहेत. मागील 15 दिवसांपासून मी भेटीसाठी वेळ मागत आहे, परंतु मुख्यमंत्री मान हे कुणाचाही सामना करण्यास पात्र नसल्याचे आज सिद्ध झाले असा दावा बिट्टू यांनी केला.
मान सरकार भाजप कार्यकर्त्यांना त्रास देत आहे. याचसंबंधी मी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो होतो. आप नेते मनी सिसोदिया हे मान यांच्यासंबंधी पंजाबच्या आमदारांकडून फीडबॅक मिळवित असल्याचा दावा बिट्टू यांनी केला आहे.