For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘युनिटी मॉल’वरुन विधानसभेत गोंधळ

02:58 PM Jan 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘युनिटी मॉल’वरुन विधानसभेत गोंधळ
Advertisement

विरोधकांनी सभापतींसमोरील हौदात जाऊन केला निषेध: घोषणाबाजी, गोंधळामुळे कामकाज 10 मिनिटे तहकूब

Advertisement

पणजी : चिंबल येथे युनिटी मॉलच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्य विधानसभेत उमटले. काल मंगळवारी दुपारनंतरच्या सत्रात विरोधी पक्षीय आमदारांनी युनिटी मॉलच्या विरोधात आवाज उठवला आणि घोषणाबाजी करीत सभापती गणेश गांवकर यांच्यासमोर येऊन निषेध नोंदवला. तसेच सरकारच्या विरोधात टीका केली. यावेळी कामकाज चालवणे अशक्य झाल्यामुळे सभापतींनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. दरम्यान, चिंबलच्या आंदोलकांना बोलणी करण्यासाठी आज बुधवारी दुपारी 4 वा. विधानसभा संकुलात पाचारण करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली. त्यांच्यासोबत विरोधी आमदारांनी देखील चर्चेसाठी यावे, अशी सूचनाही डॉ. सावंत यांनी केली आहे.

सांताक्रूझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी तोयार तळी आणि तेथे होणाऱ्या विकासकामांबाबतची लक्षवेधी सूचना मांडून खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या चर्चेच्यावेळी वरील प्रकार घडला. त्यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, अॅल्टॉन डिकॉस्ता, वीरेश बोरकर, व्हेन्झी व्हिएगश, क्रूझ सिल्वा असे एकूण पाचजण पुढे गेले. युनिटी मॉल नको अशी घोषणाबाजी त्यांनी केली. त्यांनी जागेवर बसावे म्हणून सभापतींनी वारंवार विनंती केली व समज दिली. परंतु त्यांनी ऐकले नाही. शेवटी सभापतींनी विधानसभेचे कामकाज तहकूब केले. तेव्हा निर्माण झालेला गोंधळ शांत झाला. आमदार विजय सरदेसाई हजर असूनही विरोधकांच्या त्या कृतीत सहभागी झाले नाहीत. कार्लोस फेरेरा हे सभागृहात हजर नव्हते.

Advertisement

सदर विषयावरील चर्चेच्यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, आंदोलनकर्त्या लोकांना चर्चेसाठी सभापतींनी निरोप पाठवून बोलवावे. त्यांच्याशी चर्चा करण्यास सरकार तयार आहे. स्थानिक आमदार यापूर्वी काही लोकांना घेऊन आले होते व त्यांच्याशी या अगोदर चर्चा झालेली आहे. तेथील जैवविविधता समिती अध्यक्षांना याची जाणीव असून तेच आता विरोध करीत आहेत, असे डॉ. सावंत यांनी विधानसभेत सांगितले. ओलित क्षेत्रातील येणाऱ्या राज्यातील सर्व तलावांची जपणूक करण्याचे प्रयत्न सरकार करीत असून युनिटी मॉलचा सर्वाधिक लाभ चिंबलकरांना होणार आहे तसेच तोयार तळीला धक्का लागणार नाही. मॉलसाठीचे सर्व परवाने घेण्यात आल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.

Advertisement
Tags :

.