जनतेने नाकारलेल्यांकडून संसदेत गोंधळ
विरोधी पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शरसंधान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जनतेने वारंवार नाकारलेल्या विरोधी पक्षांकडून संसदेत गोंधळ घातला जात आहे. संसदेच्या कामकाजात बाधा आणून ते आपले नैराश्य लपवू पहात आहेत. सरकार संसदेत कोणत्याही मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यास सज्ज आहे. मात्र, विरोधी पक्षांनी थोडा संयम दाखवून कामकाज होऊ देण्याची आवश्यकता आहे. विरोधी पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतल्यास बरेच प्रश्न मार्गी लागू शकतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
सोमवारी प्रारंभ झालेले संसदेचे शीतकालीन अधिवेशन अत्यंत महत्वाचे आहे. या अधिवेशन काळात अनेक महत्वाच्या विधेयकांवरीच चर्चा कार्यक्रमपत्रिकेत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी कामकाजात व्यत्यय निर्माण होऊ देऊ नये. असा गोंधळ घालून कामकाज बंद पाडल्याने विरोधकांचे कोणतेही राजकारण साध्य होणार नाही. हा अनुभव वारंवार येऊनही विरोधक आपला हेका सोडत नाहीत, ही बाब लोकशाहीला घातक आहे, अशा अर्थाची टीका त्यांनी विरोधकांवर केली.
घटनेचे 75 वे वर्ष
सोमवारी प्रारंभ करण्यात आलेले शीतकालीन अधिवेशन वैशिष्ट्यापूर्ण आहे. भारताच्या राज्य घटनेच्या 75 व्या वर्षाचा प्रारंभ या आधिवेशनापासून होत आहे. तसेच आता 2024 हे वर्ष संपत आले आहे. लवकरच नूतन वर्षाचा शुभारंभ होणार आहे. मंगळवारी संसदेच्या संविधान सदनात सर्व सदस्य घटनेच्या 75 व्या वर्षाचा प्रारंभ साजरा करणार आहेत. तथापि, जनतेने वारंवार नाकारलेले काही मोजके लोक गोंधळवाद आणि गुंडगिरीसदृश वर्तनाचे दर्शन घडवून संसद ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनता हे सर्व पहात आहे, अशी खोचक टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांचा समाचार घेताना केली.
नव्या सदस्यांची हानी
नव्या संसदेत अनेक नवे सदस्य आलेले आहेत. त्यांच्यापाशी नव्या संकल्पना आणि नवी ऊर्जा आहे. तथापि, गोंधळाला सोकावलेले काही सदस्य या सदस्यांचे दमन करीत असून त्यांना त्यांच्या संकल्पना संसदेत मांडण्यापासून रोखत आहेत. अशा गोंधळवादी सदस्यांमुळे नव्या सदस्यांना संसदेत आपले विचार मांडण्याची संधी मिळत नाही, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.