For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मतगणनेपूर्वी कोलकाता येथे गोंधळ

06:54 AM May 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
मतगणनेपूर्वी कोलकाता येथे गोंधळ
Advertisement

ममता बॅनर्जी, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे धरणे

Advertisement

वृत्तसंस्था / कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता मतगणनेची प्रतीक्षा आहे. मतगणना 4 मे या दिवशी होणार आहे. पण मतगणनेपूर्वीच या राज्याची राजधानी कोलकाता येथे गोंधळाला प्रारंभ झाला आहे. ज्या स्ट्राँगरुमध्ये मतदानयंत्रे ठेवण्यात आली आहेत, त्या स्ट्राँगरुममधून टपाल मतत्रिका बाहेर नेण्यात येत आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. तसेच, या मतपत्रिकांमध्ये फेरफार करण्यात येत आहे, असाही त्यांचा आरोप आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी स्ट्राँगरुमबाहेर गुरुवारी धरणे धरले. केंद्रीय निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

Advertisement

सर्व स्ट्राँगरुम्स पूर्णत: सीलबंद करण्यात आल्या असून सर्व मतदानयंत्रे आणि सर्व टपाल मतपत्रिका सुरक्षित आहेत. कोणत्याही फेरफार कशातही करण्यात आलेला नाही. सर्व खोल्या सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसमोरच सीलबंद करण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाने त्वरित दिले आहे. मात्र, तृणमूल काँग्रेसने आपला आरोप मागे घेण्यास नकार दिला. तसेच खोल्या एकदा सील केल्यानंतर त्या मतगणनेच्या दिवसापर्यंत उघडल्या जाणार नाहीत, असा निर्णय बुधवारी रात्री घेण्यात आला होता. तरीही, खोल्यांमध्ये काही अधिकारी पोहचले आहेत, असे प्रतिपादन तृणमूल काँग्रेसने केले. मात्र, काही वेळाने या पक्षाने गुरुवारी रात्री उशीरा धरणे मागे घेत असल्याचीही घोषणा पेलेली आहे.

नेमका प्रकार काय...

गुरुवारी संध्याकाळी कोलकाता येथील स्ट्राँगरुममध्ये काही व्यक्ती दिसून आल्याचा आरोप तृणमूल काँग्रेस पक्षाच्या काही प्रतिनिधींनी केला. ही दृष्ये स्ट्राँगरुममध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीत दिसल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी ही कथित बाब आपल्या नेत्यांना कळविल्यानंतर या पक्षाने नेते आणि कार्यकर्ते यांनी स्ट्राँगरुमच्या बाहेर असलेल्या मैदानात जमण्यास प्रारंभ केला. काही वेळाने ममता बॅनर्जी यादेखील तेथे पोहचल्या. आमच्या पक्षाला सूचना न देताच काही अधिकारी खोलीत शिरल्याचा या पक्षाच्या प्रतिनिधींनी आणि नेत्यांनी केला.

ही नेहमीची प्रक्रिया

मतगणनेपूर्वी टपाल मतपत्रिका वेगळ्या केल्या जातात. ही नेहमीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया करण्यापूर्वी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना सूचना देण्यात आली होती. त्यांच्या उपस्थितीतच ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. त्यामुळे सूचना देण्यात आली नव्हती, हा आरोप धादांत खोटा आहे, असे केंदीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. मतदानयंत्रे किंवा मतपत्रिका यांच्यात फेरफार करण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही. कारण सर्व पक्षांचे प्रतिनिधी तेथेच असतात. त्यामुळे त्यांच्या अपरोक्ष काहीही घडू शकत नाही, असेही केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

अधिकारी वेगळ्याच स्ट्राँगरुममध्ये...

मतदान यंत्रे असलेल्या स्ट्राँगरुममध्ये अधिकारी गेलेलेच नाहीत. या खोल्यांच्या शेजारी आणखी एक स्ट्राँगरुम आहे. तेथे प्रत्येक मतदारसंघातील सीलबंद टपाल मतपत्रिका ठेवण्यात आल्या आहेत. मतदानाच्या पूर्वी त्या प्रत्येक मतदारसंघ निहाय वेगळ्या केलेल्या आहेत की नाही, याची तपासणी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींच्या समोर केली जाते. तशीच ती केली गेली आहे. त्यामुळे या संबंधीचे सर्व आरोप पूर्णत: निराधार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय निवडणूक आयोगाने केले. आता तृणमूल काँग्रेसने धरणे मागे घेतल्याने प्रकरणावर पडदा पडला आहे.

टपाल मतपत्रिकांवरुन धरणे

ड टपाल मतपत्रिका हलविण्यात येत असल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप

ड केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळला आरोप, सर्व काही आहे सुरक्षित

ड मतगणनेच्या आधी मतदारसंघनिहाय टपाल मतपत्रिका होतात वेगवेगळ्या

Advertisement
Tags :

.