सिद्धेश्वर यात्रोत्सवात ‘हर हर महादेवा’चा गजर
मुचंडी येथे भाविकांची अलोट गर्दी : आजपासून तीन दिवस कुस्ती मैदान
वार्ताहर/किणये
मुचंडी येथील जागृत सिद्धेश्वर देवस्थानची यात्रा शुक्रवारी उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली. पारंपरिक वाद्यांचा गजर ‘हर हर महादेव’ श्री सिद्धेश्वराचा जयघोष करीत सायंकाळी इंगळ्यांचा कार्यक्रम झाला. इंगळ्या पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली होती. गुरुवार दि. 10 रोजी पासून यात्रेला प्रारंभ झाला. गुरुवारी सायंकाळी गावात आंबिलगाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. या आंबिलगाड्यांच्या मिरवणुकीत गुलालाची उधळण व पारंपरिक वाद्यांचा गजर झाला. शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. सकाळी गावात सकाळी सजवलेल्या बैलांची पुन्हा मिरवणूक काढली. सकाळी सिद्धेश्वर मंदिरात अभिषेक व विधिवत पूजा अर्चा केली .दिवसभर हजारो भाविकांनी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले.
सायंकाळी चार नंतर पारंपारिक वाद्य व टाळ मृदंगाच्या गजरात गावातून पालखी मिरवणूक निघाली. ही पालखी सिद्धेश्वर मंदिर परिसरात आल्यानंतर पुजारी व हकदार यांनी विधिवत इंगळ्यांची पूजा केली. इंगळ्यांमधून भक्तीभावाने पळून आपला नवस फेडला. भाविक इंगळ्यांमधून पळत सिद्धेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घातली व त्यानंतर मंदिरात येऊन पुन्हा सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खेळणी आईक्रीम व विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते. यात्रेनिमित्त शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस कुस्ती मैदान आयोजिले आहे.